निलडोहच्या अंगणवाडीला ‘आयएसओ’

By admin | Published: August 4, 2016 02:15 AM2016-08-04T02:15:55+5:302016-08-04T02:15:55+5:30

अस्वच्छता, दुर्गंधी, भ्रष्टाचार अंगणवाड्यांना लागलेली ही विशेषणे. अंगणवाडीची चर्चा होताना दुरवस्थेवरच बोलले जाते.

'Iso' at Nildoh's Anganwadi | निलडोहच्या अंगणवाडीला ‘आयएसओ’

निलडोहच्या अंगणवाडीला ‘आयएसओ’

Next

इच्छाशक्तीच्या बळावर यश : विदर्भात पहिल्यांदा मिळाले मानांकन
मंगेश व्यवहारे/
मुकेश कुकडे नागपूर
अस्वच्छता, दुर्गंधी, भ्रष्टाचार अंगणवाड्यांना लागलेली ही विशेषणे. अंगणवाडीची चर्चा होताना दुरवस्थेवरच बोलले जाते. परंतु इच्छाशक्ती असेल तर अंगणवाडीला ‘आयएसओ’ मानांकन ही मिळू शकते. नागपुरातील निलडोह ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रं २६ च्या सेविकेने दाखविलेल्या इच्छाशक्तीच्या बळावर आयएसओ मानांकन मिळविण्यात यश आले. आयएसओ मानांकन मिळविणारी विदर्भातील ही एकमेव अंगणवाडी आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील निलडोह ग्रा.पं. अंतर्गत ही अंगणवाडी येते. सुरेखा चहांदे या येथे अंगणवाडी सेविका म्हणून २३ वर्षापासून कार्यरत आहे. त्यामुळे अंगणवाडीबद्दल त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये अंगणवाड्यांना आयएसओ मिळाल्याचे त्यांनी ऐकले होते. आपल्याही अंगणवाडीला आयएसओ मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी प्रशासनापुढे प्रस्ताव ठेवला. त्यांना मान्यताही मिळाली. परंतु त्यासाठी आर्थिक मदत मिळाली नाही. लोकवर्गणीच्या माध्यमातून, स्वत:जवळचे पैसे खर्च करून, ग्रा.पं. च्या सहकार्याने अंगणवाडीची इमारत उभी केली. अंगणवाडींना मिळणारे मानांकन निव्वळ इमारत अथवा स्वच्छतेवर मिळत नाही. अंगणवाडीच्या माध्यमातून सहा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्याची यशस्वीरीत्या अंमलबजावणी होणेही गरजेचे असते. यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे आरोग्य, शिक्षण याबरोबरच गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना अनौपचारिक शिक्षण व पूरक पोषण आहार, लसीकरण आदीचा समावेश असतो. सुरेखा चहांदे यांनी आयएसओ संदर्भात नोंदणी केल्यानंतर तीन टप्प्यात आयएसओच्या पथकाने अंगणवाडीची तपासणी केली. पहिल्या टप्प्यात इमारत, स्वच्छता, व्यवस्थापन तपासले.
दुसऱ्या टप्प्यात पोषण आहार, अंगणवाडीतून नागरिकांना मिळणारा लाभ याची पाहणी केली. तिसऱ्या टप्प्यात अंगणवाडीचे सर्वांगीण कार्य, रेकॉर्ड तपासले. तपासणी केल्यानंतर २०१५ मध्ये त्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले.
येथे भेट दिल्यावर खरोखरच अंगणवाडी सेविकेने घेतलेली मेहनत दिसून येते. लहान मुलांसाठी हेल्दी आणि मनोरंजनात्मक वातावरण, स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप येथे बघायला मिळते. अंगणवाडीच्या कलरफुल भिंती मुलांचा उत्साह वाढवितात. आकार ओळख, अंक ओळख, मुळाक्षरे वाचन, अंक वाचन याचे कलरफुल चार्टने भिंती रंगलेल्या दिसतात. मुलांसाठी खेळणी, स्वच्छ स्वयंपाकगृह, शुद्ध पाणी, संगणक, टीव्ही हे सुद्धा अंगणवाडीत उपलब्ध आहे. किशोरवयीन मुलींसाठी स्तनदा मातांसाठी आरोग्य, कुपोषण, पोषण आहार, विविध योजनेचे चार्ट लावण्यात आले आहेत.
अंगणवाडीच्या परिसरात गांडुळखत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. छोटासे लॉन साकारले आहे. येथे शिकणारे विद्यार्थी बहुतांश एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांचे आहेत. त्यांना पोषक वातावरण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे.

 

Web Title: 'Iso' at Nildoh's Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.