इस्राेचे वैज्ञानिक सिंदेवाहीत दाखल; काेडेड नंबर्सवरून कळेल, ‘ते’ काेणत्या देशाचे ‘सॅटेलाइट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2022 07:00 AM2022-04-09T07:00:00+5:302022-04-09T07:00:07+5:30
Nagpur News २ एप्रिल रोजी अवकाशातून पडलेल्या अवशेषांची तपासणी करायला इस्रोचे पथक चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाहीत दाखल झाले.
निशांत वानखेडे/संदीप बांगडे
नागपूर/सिंदेवाही (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रह्मपुरी व चिमूर तालुक्यात आकाशातून पडलेले अवशेष नेमके न्यूझीलंड की चीनचे, याबाबत लाेकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शुक्रवारी या अवशेषांचे निरीक्षण करायला सिंदेवाहीत आलेल्या भारतीय अंतराळ संशाेधन संस्था (इस्राे) च्या वैज्ञानिकांनी याबाबत साेईस्करपणे माैन बाळगले. मात्र, या प्रत्येक साहित्यावर काही काेडेड नंबर्स आहेत, जे डिकाेड केल्यानंतरच सॅटेलाइट काेणत्या देशाचे हाेते, याबाबत खुलासा हाेऊ शकेल, असे संकेतही त्यांनी दिले.
२ एप्रिलच्या रात्री आकाशातून काही अवशेष जमिनीवर पडले. यामध्ये धातूची एक मोठी रिंग होती. तर सहा गोल आकारातील सिलिंडर होते. आकाशातून लालभडक तप्त रिंग पडताना अनेकांनी बघितली. ती रिंग सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात पडली. तर परिसरातील भागात सहा सिलिंडर पडले. तेव्हापासून हे अवशेष नेमके कशाचे, याबाबत कुतूहल आहे. हे सर्व अवशेष सिंदेवाही पोलीस ठाण्यात जमा करून ठेवण्यात आले होते. धातूच्या रिंगसह सहा सिलिंडरचे निरीक्षण करण्यासाठी बंगळुरू येथून इस्रो या अवकाश संस्थेचे दोन वैज्ञानिक शुक्रवारी सिंदेवाहीत दाखल झाले. या वैज्ञानिकांमध्ये एम. शाहजहान व मयुरेश शेट्टी यांचा समावेश होता. यावेळी तहसीलदार गणेश जगदाळे व खगाेल अभ्यासक आणि स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे हेही उपस्थित हाेते. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी यांनी याबाबत इस्रोला कळविले हाेते. इस्रोने याची तत्काळ दखल घेत दोन वैज्ञानिकांना सिंदेवाहीत या वस्तूच्या निरीक्षणासाठी पाठविले.
या अवशेषांचे निरीक्षण केल्यानंतर या वस्तू सॅटेलाइट राॅकेटचे बूस्टर असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या सिलिंडरमध्ये कोणते इंधन आहे, हे अवशेष कुण्या देशाचे आहेत, यावर संशोधन करून आठवडाभरात निर्णय दिला जाईल, असे संकेतही या वैज्ञानिकांनी यावेळी दिले. त्यांनी लाडबोरी येथे अवशेष पडलेल्या स्थळी भेट देऊन प्रत्यक्षदर्शींचीही भेट घेऊन चर्चा केली. मात्र, गाेपनीयतेचे कारण देत वैज्ञानिकांनी चौकशी व निरीक्षणाचा अहवाल देण्यास नकार दिला.
अवशेष संशोधनासाठी इस्रोमध्ये नेले
हे अवशेष संशोधनासाठी बंगळुरूला इस्राे सेंटरमध्ये नेण्यात आले. या अनुषंगाने पोलीस ठाण्याला पत्र देण्यात आले. यानंतर रात्री कंटेनरच्या मदतीने हे सर्व अवशेष बंगळुरूकडे रवाना झाले. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी राॅकेट बूस्टरचे अवशेष पडले हाेते. निरीक्षणासाठी वैज्ञानिकांची टीम वर्ध्यालाही जाणार आहे का, याबाबत स्पष्ट झाले नाही.
इंधन हायड्राेजनचे की ऑक्सिजनचे?
अवशेषांसाेबत पडलेले गाेलाकार गाेळे हे राॅकेट बूस्टरच्या इंजिनला नियंत्रित करणारे स्काॅयबाॅल असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये इंधन भरलेले आहे. ते हायड्राेजनचे, ऑक्सिजनचे की दुसरे काही आहे, याबाबत बंगळुरूच्या प्रयाेगशाळेत निरीक्षण केले जाणार असल्याचे वैज्ञानिकांनी संकेत दिले. हा संपूर्ण अहवाल आठ दिवसांत सरकारकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निर्णय सरकारचा
हे साहित्य धाेकादायक आहेत की नाही, याबाबत अभ्यासानंतर कळेल. पुढील कारवाईबाबतचे निर्णय इस्राेच्या अधिकारक्षेत्रात नाही. वैज्ञानिक आपला अहवाल सरकारला देणार. पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय निर्णय घ्यायचा, ते सरकारचे काम आहे, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.