या 'बस'मध्ये बसा अन् अंतराळ फिरून या...! 'अंतरिक्ष बस' विदर्भाच्या प्रवासावर; 'इस्त्रो'चे मंगळ मिशन
By निशांत वानखेडे | Published: August 14, 2023 06:21 PM2023-08-14T18:21:23+5:302023-08-14T18:22:31+5:30
आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते.
नागपूर: आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते. या अंतराळाची सफर घडविण्याची मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) एका बसच्या माध्यमातून सुरू केली आहे. ही ‘अंतरिक्ष बस’ सध्या विदर्भाच्या प्रवासावर असून मंगळवारी स्वातंत्र्य दिनी ती नागपूरहून रवाना होणार आहे.
नागरिकांना व विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये अंतराळातील घडामोडींचे कुतूहल दूर करून त्यांच्या खगोल विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी इस्रोने ही मोहीम सुरू केली आहे. विज्ञान भारतीसोबत गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारानुसार इस्रोच्या आउटरिच कार्यक्रमाची जबाबदारी विज्ञान भारतीने घेतली आहे व त्या सहकार्याने ही अंतरिक्ष बस देशभर फिरविली जात आहे. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाचे सचिव नरेश चाफेकर यांनी माहिती दिली. इस्त्रोच्या इतिहासात आतापर्यंत राबविल्या गेलेल्या ‘मिशन मंगळ’, चंद्रयान-२ मोहीम व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती चित्रफितीतून होईल. रॉकेट कसे उडते, रॉकेटवर सॅटेलाईट कसे असेंबल केले जाते व अंतराळात सोडले जाते, त्यांचे सर्व मॉडेल्स व अभ्यासपूर्ण टेक्नीकल माहिती विद्यार्थ्यांना मिळेल.
१५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैदराबादचे संचालक जी. श्रीनिवास राव यांच्या उपस्थितीत या अंतरिक्ष बसचे उद्घाटन होईल आणि ती विदर्भाच्या प्रवासावर रवाना होईल. सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शाळेत ती पाेहचेल. प्रत्येक जिल्ह्यात किमान १५ दिवस ती फिरणार आहे. आसपासच्या शाळांनी या अंतरिक्ष बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन चाफेकर यांनी केले. अंतराळ दर्शनासह विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकिंग, वादविवाद स्पर्धा, इलोकेशन, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.