आकाशातून पडलेल्या वस्तूंच्या अभ्यासासाठी इस्राेच्या टीमची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 08:15 AM2022-04-06T08:15:00+5:302022-04-06T08:15:01+5:30
Nagpur News शनिवारी रात्री आकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोची टीम येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : शनिवारी रात्री आकाशातून पडलेले तप्त सिलिंडर, वस्तू आता ठिकठिकाणी सापडायला लागल्या आहेत. सध्या या सर्व वस्तू संबंधित पाेलीस स्थानकांच्या ताब्यात असून लवकरच भारतीय अंतराळ संशाेधन संस्था-इस्राेची टीम त्यांचा अभ्यास करायला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशभरात खळबळ उडवून देणारी अवकाश घटना शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. उल्कावर्षाव व्हावा तसे लाल रंगाचे साहित्य आकाशातून विदर्भात ठिकठिकाणी पडले. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात लाबडाेरी येथे १० फूट व्यासाची रिंग त्याच रात्री सापडली. त्यानंतर याच तालुक्यात रविवारी गुंजेवाही काेटा व आसाेला मेंढा येथे तलावाजवळ गाेलाकार गाेळे सापडले. तालुक्यातील पवनपार येथेही अशाप्रकारचे दाेन गाेलाकार गाेळे सापडले. रिंग आणि चार गाेळे सध्या सिंदेवाही पाेलीस स्थानकात जमा आहेत. दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात वाघाेडा येथे सापडलेला एक गाेलाकार गाेळा समुद्रपूर पाेलीस स्थानकात आहे. अशाप्रकारे चंद्रपूर जिल्ह्यात पाच व वर्ध्याचा एक असे सहा गाेळे आहेत. सॅटेलाईटचे हे अवशेष आणखी किती व कुठे कुठे पडले आहेत, याबाबतही सर्वांच्या मनात उत्सुकता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाेलिसांनी प्राथमिक पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. सूत्रानुसार, जिल्हाधिकारी यांनी याबाबत राज्य सरकार व इस्राेला माहिती पाठविली आहे. या वस्तूंच्या अभ्यासासाठी इस्राेतर्फे खगाेल तज्ज्ञांची टीम लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. या सर्व वस्तू उपग्रह वाहून नेणाऱ्या राॅकेट बूस्टरच्या असल्याचा दावा केला जात आहे. मात्र ते काेणत्या देशाचे आहेत, त्या पडल्या की पाडल्या गेल्या, अशा अनेक प्रश्नांचे प्रचंड कुतूहल लाेकांच्या मनात आहे. खगाेल तज्ज्ञांच्या अभ्यासानंतरच या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सापडणार आहेत.
ते गाेळे हायड्राेजन गॅस भरलेले
खगाेल अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी सिंदेवाहीत जाऊन या वस्तूंचे निरीक्षण केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व गाेलाकार गाेळे हायड्राेजन गॅस भरलेले आहेत. उपग्रह वाहून नेणाऱ्या राॅकेट बूस्टरच्या ट्रायजेनिक इंजिनला नियंत्रित करण्यासाठी या हायड्राेजन वाॅल्व्हचा वापर केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ते काेणत्या देशाचे आहेत, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे ते म्हणाले.