दूषित व पाणीटंचाईच्या मुद्यावर नागपूर मनपात विरोधक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:10 AM2018-04-20T00:10:43+5:302018-04-20T00:10:56+5:30
उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. टंचाईसोबतच दूषित पाण्याच्या मुद्यावरून विरोधक आक्र मक असल्याने शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. टंचाईसोबतच दूषित पाण्याच्या मुद्यावरून विरोधक आक्र मक असल्याने शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चेची मागणी करण्याच्या प्रयत्नात विरोधक आहेत. सत्तापक्षाच्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागातही पाणीटंचाईची ओरड आहे. परंतु या मुद्यावरून सत्तापक्षाची कोंडी होण्याची शक्यता विचारात घेता पक्षाच्या नगरसेवकांना गुरुवारी बैठकीत सूचना देण्यात आल्या. त्यामुळे टंचाई असली तरी सत्तापक्षाचे नगरसेवक यावर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाही.
दूषित पाणीपुरवठा व पाणीटंचाईच्या मुद्यावरून शहरातील विविध भागात आंदोलन करण्यात आले. सभागृहातही या मुद्यावरून सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची विरोधकांना संधी आहे. परंतु काँग्रेस दोन गटात विभागली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच निधी वाटपातील भेदभाव व अन्य महत्त्वाच्या मुद्यावर काँग्रेस संघटित नाही. मध्य नागपुरातील अनेक वस्त्यात पाण्याची टंचाई आहे. नागरिकांनी आंदोलन केले परंतु काँग्रेस संघटित नसल्याने आक्रमणाची धार कमी झाली आहे. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला असून यावर ते आक्रमक आहेत.
दूषित व कमी दबाने पाणीपुरवठा
कन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. २४ बाय ७ योजनेच्या माध्यमातून शहरातील किती भागातील नागरिकांना २४ तास पाणी मिळते, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. मागील महिन्याच्या सर्वसाधारण सभेतही पाण्याचा मुद्दा गाजला होता. शुक्रवारी पुन्हा हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
एम्प्रेस मॉलच्या मुद्यावर दटके आक्रमक
गांधीसागर तलावाच्या बाजूला उभारण्यात येत असलेल्या एम्प्रेस सिटीच्या बांधकामाचा वाद कोर्टात सुरू आहे. या प्रकरणात महापालिकेची कोंडी झाली आहे. असे असतानाच माजी महापौर प्रवीण दटके यांनी एम्प्रेस सिटीच्या बांधकामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे एम्प्र्रेस सिटीतील विहिरीत तीन मजुरांचा मृत्यू झाला. याविरोधात नागरिकांनी आंदोलन के ले. या प्रकरणात प्रवीण दटके व रमेश पुणेकर यांच्यासह ७० लोकांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे दटके व पुणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.