मनपा सभागृहात गाजणार विकास कामांच्या ऑडिटचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:15 PM2019-03-04T23:15:50+5:302019-03-04T23:16:55+5:30
महापालिके च्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांना मंजुरी दिली जाते. परंतु अनेक कामांना सुरुवात होत नाही. परिणामी सीएसआरचे दर वाढले म्हणून वाढीव दराने याच कामांना पुन्हा मंजुरी घेतली जाते. तसेच करण्यात आलेल्या विकास कामांचे ऑडिट होणे अपेक्षित आहे. मात्र वर्षानुवर्षे ऑडिट होत नाही. यामुळे विकास कामांच्या दर्जावर नगरसेवकांनी शंका व्यक्त केली आहे. हा मुद्दा मंगळवारी होणाऱ्या विशेष सभेत उपस्थित करणार असल्याने विकास कामांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिके च्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांना मंजुरी दिली जाते. परंतु अनेक कामांना सुरुवात होत नाही. परिणामी सीएसआरचे दर वाढले म्हणून वाढीव दराने याच कामांना पुन्हा मंजुरी घेतली जाते. तसेच करण्यात आलेल्या विकास कामांचे ऑडिट होणे अपेक्षित आहे. मात्र वर्षानुवर्षे ऑडिट होत नाही. यामुळे विकास कामांच्या दर्जावर नगरसेवकांनी शंका व्यक्त केली आहे. हा मुद्दा मंगळवारी होणाऱ्या विशेष सभेत उपस्थित करणार असल्याने विकास कामांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
प्रभागातील विकास कामे मंजूर केली जातात. कामाला सुरुवात होत नाही. पुढील वर्षात कामाचा खर्च वाढतो. तसेच विकास कामांचे गेल्या चार-पाच वर्षात ऑडिट झालेले नाही. याबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित करणार असल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे यांनी दिली.
महामेट्रो करणार सोनेगाव तलावाचा विकास
शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात भोसलेकालीन सोनेगाव तलाव आहे. तलावाचे पर्यावरणीय संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेने सोनेगाव तलाव सौंदर्यीकरण प्रकल्प मंजुरीस्तव शासनाकडे सादर केला होता. नगरविकास विभागाने तलाव सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या १७.३२ कोटीच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता प्रदान केली आहे. मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून सोनेगाव तलाव सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यास महामेट्रोकडे हस्तांतरित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. याबाबतचा प्रस्ताव सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
नवीन करवाढ नाही
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १२८(अ)अंतर्गत कर व कर आकारणी विभाग, मालमत्ता करामध्ये समाविष्ट असलेले कर कलम ९९(कराचे दर निश्चित करणे)याअंतर्गत पुढील आर्थिक वर्षात महापालिकेद्वारे कर आकारणीचे दर निश्चित केले जातात. याबाबतचा प्रस्ताव सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. प्रस्तावात कुठल्याची प्रकारची करवाढ प्रस्तावित नाही. २०१८-१९ या वर्षातील कराचे दर कायम ठेवले जाणार आहे.
२०० कोटीचे कर्ज घेणार
आर्थिक स्थितीचा विचार करता महापालिकेने शहरातील विविध विकास प्रकल्पासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर कर्ज घेण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.