काश्मीरच्या मुद्यावर भूतकाळात चूकच झाली
By admin | Published: October 26, 2015 02:52 AM2015-10-26T02:52:42+5:302015-10-26T02:52:42+5:30
काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत.
सुमित्रा महाजन : आता कणखर
भूमिका घेण्याची गरज
नागपूर : काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत. काश्मीरचे हे घोंगडे आणखी किती दिवस भिजत राहणार आहे असा प्रश्न उपस्थित करत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. १९६५ च्या युद्धातील माजी सैनिकांच्या सत्कार समारंभादरम्यान त्या बोलत होत्या. लोकसभाध्यक्षांनी अशाप्रकारे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आ. मितेश भांगडिया प्रामुख्याने उपस्थित होते. भारताने कधीही पाकिस्तानवर युद्ध लादले नाही. परंतु पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानचे काय हाल झाले हे सर्व जगाने पाहिले. परंतु जर काश्मीरच्या मुद्यावर वेळीच तोडगा काढण्यात आला असता तर आज त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नसते. आज त्या जखमेचा नासूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपला शेजारी अजूनही काश्मीरचा राग आळवतोय. आता मात्र या मुद्यावर कणखर भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
हे भिजत पडलेले घोंगडे वाळविण्यासाठी नेत्यांना प्रवृत्त करण्याची वेळ आली आहे आणि आताचे नेते जर असे करत असतील तर जनतेने त्यांना समर्थन करावे, असे त्या म्हणाल्या. देशाला योग्य नेतृत्व असले की त्याचे समर्थन करण्याची आवश्यकता असते. लालबहादूर शास्त्री यांच्यामागे पूर्ण देश उभा होता. त्यामुळे योग्य निर्णय घेणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे रहावे असे प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)
काश्मीरमुळे होते सैनिकांचे स्मरण
केवळ युद्धकाळात सैनिकांची आठवण होते व इतर वेळी ते विस्मृतीत जातात असे बोलले जाते. पण, भारतात हे चित्र जरासे वेगळे असून बर्फाखाली धगधगणाऱ्या काश्मीरमुळे आपण सातत्याने सैनिकांचे स्मरण करतो. देशातील सैनिक सीमेवर एकटा लढत असला तरी त्याच्या पाठीमागे संपूर्ण देश असतो. नवीन पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार पेरले पाहिजेत, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.