महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटावा लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:10 AM2019-03-10T01:10:01+5:302019-03-10T01:12:03+5:30
अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्था’ या विषयावर प. बंगालच्या साहित्यिक कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजीव चंदन, डॉ. वर्षा अय्यर, डॉ. सुलभा पाटोळे, डॉ. नंदा तायवाडे, डॉ. लता प्र.म. यांनी सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्था’ या विषयावर प. बंगालच्या साहित्यिक कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजीव चंदन, डॉ. वर्षा अय्यर, डॉ. सुलभा पाटोळे, डॉ. नंदा तायवाडे, डॉ. लता प्र.म. यांनी सहभाग घेतला.
दिल्लीचे प्रा. संजीव चंदन यांनी या स्त्री मुक्तीच्या चळवळीचे विश्लेषण केले. महात्मा फुले यांच्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांसाठी ठोस भूमिका घेतली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच. त्याकाळी महिलांच्या मातृत्वाच्या रजेचा मुद्दा उपस्थित करणारे ते एकमेव व्यक्ती होते. महिलांच्या अधिकाराचा अजेंडा त्यांनी ठेवला, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनांना धोरण राबविण्याची सूचना त्यांनी दिली. महिलांबद्दल समानतेचा दृष्टिकोन ठेवायला समाज तयार नाही, अशावेळी शासनाने कठोरपणे त्यांच्या अधिकारासाठी पावले उचलावी, अशी तरतूद त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केली आहे. या मूल्यामुळे महिलांमध्ये एक जाणीव निर्माण झाली. मात्र संघर्षाचे दोन गट पडले. स्त्री मुक्तीच्या आंदोलनात जातीभेदाचा मुद्दा नसलेला एक गट आणि हा मुद्दा घेऊनच संघर्ष उभा करणारा दलित महिलांचा दुसरा गट. मात्र जातीभेदाचा मुद्दा नसला तरी बोलण्याचा, लग्नाचा व निर्णयाचा अधिकार पहिल्या गटातही असल्याने त्यांचे आंदोलनही ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हानच होते. त्यामुळे महिलांचा प्रत्येक संघर्ष हा कोणत्याही अर्थाने पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हानच ठरलेला आहे. आज राजकीय व्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण आणि खासगी क्षेत्रातही आरक्षणाचा मुद्दा पुढे करून आंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कल्याणी ठाकूर यांनी बाबासाहेबांना पश्चिम बंगालमधून संविधान सभेत पाठविण्यात आल्याचा उल्लेख केला. ही बाब बंगाल आणि महाराष्ट्राला एका धाग्यात जोडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कम्युनिस्टांच्या अजेंड्यात जातीभेद निर्मूलनाचा समावेश नव्हता. स्त्री-मुक्तीचे आंदोलन वर्गवारीवर आधारीतच होते व फेमिनिझममुळे उच्चवर्णीय महिलांपुरते मर्यादित होते. त्यात दलित महिलांचा समावेश नव्हता. बंगालमध्ये दलित उत्थानासाठी गुरुचंद ठाकूर व त्यांचा मुलगा होरीचंद ठाकूर यांच्या कार्याचा उल्लेख कल्याणी यांनी केला. महाराष्ट्राकडून प्रेरणा घेउन दलितांच्या प्रश्नावर बंगालमध्ये आंदोलन उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. संचालन वंदना जीवने यांनी व आभार विशाखा लांजेवार यांनी मानले.