नोटीस बजावूनही ‘बायोमेडिकल वेस्ट’ उघड्यावर

By admin | Published: May 27, 2017 02:45 AM2017-05-27T02:45:09+5:302017-05-27T02:45:09+5:30

मेयोतील रुग्णांवर उपचार केल्यानंतर निघणारा घातक जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) गेल्या कित्येक महिन्यांपासून उघड्यावर टाकला जात असल्याचे

By issuing a notice, the 'Biomedical West' opened | नोटीस बजावूनही ‘बायोमेडिकल वेस्ट’ उघड्यावर

नोटीस बजावूनही ‘बायोमेडिकल वेस्ट’ उघड्यावर

Next

मेयोला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस : कचरा विघटनाचा खर्च कोणाच्या खिशात?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयोतील रुग्णांवर उपचार केल्यानंतर निघणारा घातक जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) गेल्या कित्येक महिन्यांपासून उघड्यावर टाकला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाची चमू बुधवारी मेयोत धडकली. जैविक कचऱ्याचा ढीग पहात आश्चर्य व्यक्त करीत नोटीस बजावली. परंतु दोन दिवसानंतरही कचऱ्याची उचल झाली नसल्याने मंडळ व रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘बायो मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’ अर्थात जैव वैद्यकीय कचरा हाताळणी नियमावली १९९८ मध्ये तयार करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने २० जुलै १९९८ रोजी अधिसूचना काढून हे नियम जारी केले. याची देखरेखची जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. परंतु या मंडळाची चमू रुग्णालयाची पाहणीच करीत नसल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून रुग्णालयाचा जैविक कचरा उघड्यावर टाकला जात आहे. रुग्णाच्या शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅण्डेज, सिरिंज अशा सर्व वस्तू उघड्यावर पडून सडत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २४ मेच्या अंकात ‘ मेयोचे बायोमेडिकल वेस्ट’ उघड्यावर या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. या वृत्ताने पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाची झोप उडाली. कधी नव्हे ती या मंडळाची चमू रुग्णालयाची पाहणी करण्यास पोहचली.
जैविक कचऱ्याच ढीग पाहून गंभीर झाली. रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रशासनाने या नोटीसचे उत्तर दिले असले तरी शुक्रवारीही जैविक कचऱ्याचा ढीग कायम होता. विशेष म्हणजे, रुग्णालयातून रोज निघणाऱ्या कचऱ्याचे विघटन करण्याची जबाबदारी ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’ची आहे.
यासाठी रुग्णालय प्रशासन दरमहा ८० हजार रुपये खर्च करते. परंतु या कचऱ्याची उचलच होत नसल्याने हा खर्च कुणाच्या खिशात जातो यावरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने यावर चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजते.

चौकशीचे आदेश दिले आहेत
रुग्णालयाचा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याच्या प्रकरणावर चौकशीचे आदेश दिले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस प्राप्त झाली आहे. अनेक महिन्यांपासून कचऱ्याचा ढीग पडून असल्याने कचरा सहज उचलणे शक्य नाही. शनिवारी जेसीबी मशीनने तो उचलला जाईल.
-डॉ. सुनील लांजेवार
प्रभारी, अधिष्ठाता मेयो

Web Title: By issuing a notice, the 'Biomedical West' opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.