नागपुरातल्या उच्चभ्रू वस्तीतली ‘ती’ गल्ली बनली देखणी व सभ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 10:29 AM2017-12-25T10:29:57+5:302017-12-25T10:34:43+5:30
नागपूरच्या सिव्हिक अॅक्शन ग्रुप(कॅग)ने असे काही पाऊल उचलले की सुदामा टॉकीजच्या मागे असलेल्या गल्लीचा नूरच बदलून गेला. नाक धरून चालावे अशी घाण गल्ली कॅगने स्वच्छ आणि चकचकीत केली. त्यावर भर म्हणजे आय-क्लीन नागपूरच्या टीमने रंगरंगोटी करून या रांगेला सुंदर रूपही दिले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहरातील चकचकीत वस्ती म्हणून धरमपेठचा लौकिक. मात्र सुदामा टॉकीजच्या मागे असलेल्या गल्लीने या लौकिकाला बट्टा लावला होता. सगळीकडे कचरा, घाणीचे साम्राज्य आणि रात्रीला मद्यपींचा हैदोस. त्यामुळे या भागात राहणाऱ्यांनाही या गल्लीचा वावर नकोसा झाला होता. मात्र येथील नागरिकांनी स्थापन केलेल्या सिव्हिक अॅक्शन ग्रुप(कॅग)ने असे काही पाऊल उचलले की या गल्लीचा नूरच बदलून गेला. नाक धरून चालावे अशी घाण गल्ली कॅगने स्वच्छ आणि चकचकीत केली. त्यावर भर म्हणजे आय-क्लीन नागपूरच्या टीमने रंगरंगोटी करून या रांगेला सुंदर रूपही दिले.
सुदामा सिनेमागृहाच्या अगदी मागे असलेली ही गल्ली म्हणजे रहिवाशांनाही नकोशी वाटावी अशीच होती. गेल्या २०-२५ वर्षांपासून हीच अवस्था. कडेला असलेल्या डीपीजवळ वस्तीतील कचरा येऊन पडायचा. त्यामुळे त्याला उकीरड्याचे रूप आले होते. मग ही घाण संपूर्ण परिसरात पसरलेली. नागरिकांनाही यावेसे वाटत नव्हते. पथदिवे नसल्याने सुनसान राहणारी ही गल्ली रात्री मद्यपींसाठी मात्र नंदनवनच ठरली होती. कॉर्नरला असलेल्या दारूच्या दुकानातून दारू घ्यायची आणि या गल्लीत येऊन बिनधास्त प्यायची. मग येथेच लघुशंका करणे, शिवीगाळ करणे, सोबतचा कचरा येथेच फेकणे हा प्रकार नित्याचाच. रात्र संपली की हा प्रकार दिवसाही चालायचाच. प्रचंड दुर्गंधी आणि पसरलेल्या घाणीमुळे नाक दाबून चालल्याशिवाय पर्यायच नव्हता. मद्यपींचा हैदोस व दुर्गंधीचे कारण पुढे करीत, काही नागरिकांनी अतिक्रमणही केले. अतिक्रमण आणि मद्यपींचे पार्किंग यामुळे ही गल्ली आणखीच अरुंद झाली. धरमपेठला एक मॉडेल वस्तीसारखा बदल करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कॅगच्या टीमने या गल्लीची अवस्था बदलण्याचा निर्धार केला. कॅगने सुरुवातीला मद्यपींचा हैदोस थांबविण्यासाठी गल्लीत पथदिवे लावून घेतले. त्यामुळे येणारे मद्यपी रात्री ९ पर्यंत तरी येईनासे झाले. पुढचे पाऊल घेत महापालिकेच्या मदतीने काही रहिवाशांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. कॅगची टीम एवढेच करून थांबली नाही. रविवारी ग्रुपच्या सदस्यांनी सकाळपासून गल्लीमध्ये स्वच्छता अभियान राबविले आणि सर्व परिसर स्वच्छ करून टाकला. घाण, दुर्गंधी आणि अतिक्रमणाने गुदमरलेल्या गल्लीने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला. या स्वच्छतेमध्ये भर घालत ‘आय-क्लीन नागपूर’च्या टीमने रंगरंगोटी करून भिंतींना सुशोभित केले. त्यामुळे आजपर्यंत ओंगळवाणे वाटणाऱ्या या गल्लीला सुंदर रूप प्राप्त झाले आहे. रविवारी सकाळी या गल्लीत आलेल्या अनेक नागरिकांना बदललेले रुप पाहून हायसे वाटले. लोकांनी सेवेत गुंतलेल्या कॅग आणि आय-क्लिनच्या टीमचे आभारही मानले.
प्रसंगी रात्री पहाराही देऊ
कॅगच्या एका सदस्याने सांगितले, आम्ही केवळ स्वच्छता आणि सुशोभीकरण करून थांबणार नाही. प्रसंगी आमच्या ग्रुपचे सदस्य येथे पहारा देऊ. मद्यपींवर आळा बसेल यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल. कचरा करणाऱ्यांवर नियमाने १००० रुपये दंड आकारला जातो. त्यासाठी मनपाने ज्येष्ठ नागरिकांची समिती नेमली आहे. या समितीच्या मदतीने अवैद्यपणे उकिरड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड आकारण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आय-क्लीनचे १११ वे अभियान
वंदना मुजूमदार व संदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आय-क्लीन नागपूरच्या टीमने आतापर्यंत ११० ठिकाणी रंगरंगोटी व सुशोभीकरण केले आहे. सुदामा टॉकीजच्या मागची गल्ली हे त्यांचे १११ वे कार्य आहे. टीममध्ये काही ज्येष्ठांसोबत अजिंक्य टोपरे, जयदीप मोघे, अथर्व देशमुख, चिन्मय पिंपळखुटे, कनय कांडगे, संजना पाटील, मुक्ता मोहरील, रोहित लोंढेकर, अश्विनी धगमवार, कविता मोहरील, १० वर्षाचा यश चौहान व त्याचे वडील झामेंद्र चव्हाण अशा यंग ब्रिगेडचा समावेश आहे.