पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससह रिफायनरी होणे फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:02+5:302021-07-15T04:07:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी तांत्रिक व्यवहारिता अहवाल तयार करण्यात येणार आहे. मात्र, मध्य भारताचा एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी तांत्रिक व्यवहारिता अहवाल तयार करण्यात येणार आहे. मात्र, मध्य भारताचा एकूण विचार करता विदर्भात रिफायनरी होणे जास्त फायदेशीर आहे. रिफायनरीसाठी पाईपलाईन उभारावी लागेल व त्याच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत कमी किमतीत पेट्रोलियम पदार्थ पोहोचतील. भविष्याच्या दृष्टीने पेट्रोलियम कॉम्प्लेक्ससह रिफायनरी होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
विदर्भात रिफायनरी उभारणे खर्चिक प्रक्रिया असेल व समुद्रापासून अंतर जास्त असल्याने क्रूड ऑईलच्या वाहतुकीवर जास्त पैसे खर्च होतील, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हे खरे असले तरी प्रत्यक्षात क्रूड ऑईलच्या एका पाईपलाईनमुळे रिफायनरीतील विविध पेट्रोलियम पदार्थ ग्राहकांकडे पोहोचविण्यास कमी खर्च होईल. शिवाय रेल्वेवरील वाहतुकीचा भार हलका होईल व त्यांना इतर फायदेशीर मालाची वाहतूक करता येईल. क्रूड ऑईल विविध मार्गांनी आणत असताना होणारे नुकसानदेखील कमी होईल. राजस्थान येथी बाडमेर, पंजाबमधील भटिंडा, हरयाणा येथील पानिपत व आसाममधील नुमालिगढ येथील रिफायनरीमध्ये नवीन पाईपलाईनसाठी मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. विदर्भातदेखील हा प्रयोग यशस्वी होईल, असे पेट्रोकेमिकल तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले.
ज्यावेळी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आणि रिफायनरी एकत्रितपणे येतात तेव्हा रिफायनरीचा फायदा जास्त वाढतो. सोबतच दर्जेदार कच्चा मालदेखील नियमितपणे मिळतो. पेट्रोकेमिकल प्रकल्पांतून निघणारे कमी दर्जाचे दुय्यम उत्पादन हे रिफायनरीतील पदार्थांसोबत शोषले जातात व त्यामुळे नफा वाढतो. शिवाय भारत आयात केलेल्या नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे. वायूची उपलब्धता आणि किंमतींमधील चढ-उतार यामुळे पेट्रोकेमिकल नफ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. जर याला रिफायनरीशी जोडले तर कच्च्या मालासाठी विविध पर्याय उपलब्ध राहू शकतात. देशातील लँड रिफायनरी या समुद्र किनाऱ्यावरील रिफायनरीप्रमाणेच फायदेशीर ठरू शकतात. दिल्लीजवळील रिफायनरी हे याचे उदाहरणच आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
.