पत्नी सासरच्या घरात बळजबरीने प्रवेश करू शकत नसल्याचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:55 AM2019-12-30T04:55:13+5:302019-12-30T04:55:20+5:30
कुटुंब न्यायालयाचा निर्णय; कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करा
- राकेश घानोडे
नागपूर : कायदेशीर हक्क असला तरी पत्नी सासरच्या घरात बळजबरीने प्रवेश करू शकत नाही. त्याकरिता तिने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय कुटुंब न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका प्रलंबित असताना पत्नी मनात येईल तेव्हा सासरच्या घरी जात होती. सासरच्या मंडळींनी घरात प्रवेश करण्यास विरोध केल्यास ती बळजबरीने आत प्रवेश करीत होती. एवढेच नाही तर, ती स्वत:सोबत गुंड प्रवृत्तीचे लोकही आणत होती. त्यामुळे पतीने कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल करून पत्नी व तिच्याशी संबंधित व्यक्तींना सासरच्या घरात प्रवेश करण्यास मनाई करण्याची विनंती केली होती. कुटुंब न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. सध्या पती-पत्नीचा विवाह कायम आहे व घटस्फोटापूर्वी पत्नीला पतीच्या घरात प्रवेश करण्यापासून थांबवता येत नाही. असे असले तरी, पत्नी ही सासरच्या घरात बळजबरीने प्रवेश करण्याचे आणि उपद्रवी कृत्य करण्याचे स्वातंत्र्य घेऊ शकत नाही. तिला कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवून सासरच्या घरात प्रवेश करता येणार नाही, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.
प्रेमविवाहाला तडे
प्रकरणातील पती सुनील व पत्नी पूजा (बदललेली नावे) यांनी २०१३ मध्ये प्रेमविवाह केला. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे एकमेकांशी खटके उडायला लागले. मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे सुनीलला त्याच्या आई-वडिलांनी घरात प्रवेश दिला नव्हता. दरम्यान, सुनीलने पूजाला सोडण्याचा निर्णय घेऊन कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका दाखल केली. त्यात त्याने पूजावर क्रूरतेचा आरोप केला आहे. सध्या तो पूजासोबत राहत नाही. असे असताना पूजा त्याच्या आई-वडिलांच्या घरात बळजबरीने प्रवेश करून उच्छाद मांडते, असे सुनीलचे म्हणणे होते.