डब्ल्यू बिल्डिंग सोडताहेत आयटी कंपन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:09 AM2021-07-29T04:09:42+5:302021-07-29T04:09:42+5:30
वसीम कुरैशी नागपूर : महाराष्ट्र एअरपोर्ट विकास कंपनीचे (एमएडीसी) मुख्य कार्यालय असलेल्या डब्ल्यू इमारतीमध्ये कार्यरत आयटी कंपन्या आता इमारतीतील ...
वसीम कुरैशी
नागपूर : महाराष्ट्र एअरपोर्ट विकास कंपनीचे (एमएडीसी) मुख्य कार्यालय असलेल्या डब्ल्यू इमारतीमध्ये कार्यरत आयटी कंपन्या आता इमारतीतील जागा सोडून इतरत्र जात आहेत. क्लाऊड डेटा, एमआरआर कंपन्या आधीच गेल्या असून आता ई-बिक्ससुद्धा जाण्याच्या तयारीत आहे. डब्ल्यू इमारत विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) असून या ठिकाणी २० कंपन्या कार्यरत होत्या. कंपन्यांना येथील जागा तीन ते पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली होती. या कंपन्या इमारतीतील ठिकाण का बदलवत आहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यासंदर्भात मिहानचे विकास आयुक्त शरण रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.
आयकराची सवलत संपल्यानंतर सेंट्रल फॅसिलिटी इमारतीतील मोठ्या जागा परत घेऊन लहान-लहान कंपन्यांना देण्याची एमएडीसीची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले. डब्ल्यू इमारतीतून इन्फोसेप्ट कंपनीने जागा खाली केली असून, आपला व्यवसाय मिहान परिसरातील इन्फोसिटीमध्ये सुरू केला आहे. जागा सोडणाऱ्या अन्य कंपन्या आयटी पार्कमध्ये गेल्या आहेत.
सुरळीत सुरू असलेल्या आयटी कंपन्या कार्यरत जागा सोडून मिहानबाहेर का जात आहे, यावर अधिकाऱ्यांनी चुप्पी साधल्याने मिहानच्या विकासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात सॉफ्टवेअर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिल्यानंतर कंपन्यांची उत्पादकता वाढली आणि कार्यालयीन खर्चही कमी झाला. कदाचित त्यामुळेही कंपन्यांनी जागा बदलली असावी, असे सूत्रांनी सांगितले.