चीफ अकाऊन्टंटकडून आयटी कंपनीची फसवणूक, स्वत:च्या कामासाठी वापरली रक्कम
By योगेश पांडे | Published: June 6, 2023 05:38 PM2023-06-06T17:38:21+5:302023-06-06T17:42:15+5:30
महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : आयटी पार्कमध्ये स्थित एका कंपनीची तेथे कार्यरत असलेल्या महिला चीफ अकाऊन्टंटने फसवणूक केली व ५.७८ लाखांचा गैरव्यवहार केला. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या कंपनीसाठी आरटीजीएसची परवानगी घेतली होती तेथे पैसे वळते न करता स्वत:चे टाईल्सचे बिल भरण्यासाठी रक्कम वापरली व उर्वरित रक्कम स्वत:च्या खात्यावर वळती करायला लावली. संबंधित महिलेवर अति विश्वास ठेवणे कंपनीला महागात पडले व अखेर या प्रकरणात राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत उगेमुगे यांची आयटी पार्क येथे विदर्भ इन्फोटेक प्रा.लि. ही कंपनी आहे. या कंपनीत चैताली पंजाबराव इंगलकर (४२, उदयनगर) ही महिला चीफ अकाउन्टंट म्हणून दीड वर्षांपासून कार्यरत होती. कंपनीचा पूर्ण आर्थिक लेखाजोखा सांभाळण्याची जबाबदारी तिच्याकडे होती व विविध क्लायंट्सला पेमेंट करण्याचे कामदेखील तीच करत होती.
कंपनीला एनजीआरटी सिस्टम्स या कंपनीला ५.७८ लाख रुपये देणे होते. चैतालीने १ नोव्हेंबर २०२२ रोजी ही रक्कम आरटीजीएस करण्यासाठी धनादेशावर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांची स्वाक्षरी घेतली. मात्र तिने काही दिवस तो धनादेश स्वत:जवळच ठेवला व त्यानंतर नाशिक येथील मिहीर सिरॅमिक्स या कंपनीला ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून पाठविली. याची कंपनीत कुणालाच माहिती नव्हती. ऑडिटदरम्यान हा खुलासा झाला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनेशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती मिळाली.
चैतालीने २०२१ मध्ये त्या कंपनीकडून १.३३ लाखांच्या टाईल्स खरेदी केल्या होत्या. तिने त्यांना पैसे आरटीजीएस केले व मी कंपनीकडून कर्ज घेतले असल्याचे त्यांना सांगितले. उर्वरित रक्कम तिने तिच्या खात्यात वळती करण्याबाबत मिहीर सिरॅमिक्सच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी तोलाराम नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ४५ हजार रुपये व चैतालीच्या खात्यात चार लाख रुपये पाठविले. विदर्भ इन्फोटेकच्या अधिकाऱ्यांनी चैतालीला याबाबत विचारणा केली असता तिने गैरव्यवहार केल्याचे कबूल केले. कंपनीचे व्यवस्थापक अश्विन जनबंधू (४१) यांच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात चैतालीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.