बँकेत पैसे भरणे व विड्रॉल करणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:32+5:302021-05-01T04:07:32+5:30
नागपूर : लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधात बँक आणि वित्तीय संस्थांना कामाची परवानगी आहे. राष्ट्रीयीकृत ते को-ऑपरेटिव्ह बँका दररोज उघडत आहेत; ...
नागपूर : लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधात बँक आणि वित्तीय संस्थांना कामाची परवानगी आहे. राष्ट्रीयीकृत ते को-ऑपरेटिव्ह बँका दररोज उघडत आहेत; पण दररोज केवळ २ वाजेपर्यंत व्यवहार होत आहेत. शिवाय बँकांमध्ये कर्मचारीही अर्धेच आहेत. अशा स्थितीत पैसे जमा करणे आणि विड्रॉल करण्यासाठी ग्राहकांना तास न तास रांगेत उभे राहून व्यवहारासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त काउंटर सुरू करून अथवा दोन शिफ्टमध्ये वित्तीय व्यवहार करण्याची मागणी होत आहे.
बँकेचे व्यवहार सुरू होण्यापूर्वीच ग्राहक रांगेत उभे राहतात. त्यामुळे स्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो. यामध्ये बहुतांश लोक कोविड रुग्णालयाशी संबंधित असतात. त्यामुळे त्यांच्याकडे बँकेत जमा करण्यासाठी रोख रक्कमही जास्त असते. यासह रुग्णालयात भरती रुग्णाचे नातेवाईक बिल अदा करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहेत. सीताबर्डी ते धरमपेठ, सदर अथवा अन्य कोणत्याही भागातील सर्व बँकांच्या शाखांची हीच स्थिती आहे. लोक व्यवहारासाठी अनेक तास रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. पासबुक अपडेट होत नाही. दुसरीकडे बँकांकडे गर्दीच्या प्रमाणात पर्याप्त कर्मचारी नाहीत. परिणामी, सकाळ होताच बँकांमध्ये मोठी रांग लागत असून सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.
बँकांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग
व्यवहाराला उशीर होत असल्यावर बँकेचे अधिकारी ठोस काहीही बोलण्यास तयार नाहीत. अनेक बँकांचे कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या धरमपेठ, सीताबर्डी आणि खामला शाखेतील सहा ते सात कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. विशेषत: कॅश काउंटर सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्याचा कामावर परिणाम झाला आहे. लसीकरणात त्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा मिळाल्याने बँकेचे कर्मचारी नाराज आहेत. कोरोना महामारीत बँकेत वर्षभर काम करीत आहेत. त्यानंतरही कोणतीही सुविधा मिळत नाही.
राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन -भेंडे
नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे म्हणाले, राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व बँका काम करीत आहेत. याच कारणाने बँकेत २ वाजेपर्यंत व्यवहार होत आहेत. या संदर्भात राज्य शासन जे निर्णय घेतील, त्याचे बँक पालन करतील.