तो विदर्भासोबत भेदभाव ठरत नाही, आषाढीला केवळ मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:04 PM2021-07-07T14:04:25+5:302021-07-07T14:05:37+5:30
पंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली
नागपूर : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची परंपरा जपण्यासाठी यंदा मनाच्या दहा पालख्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. यासंदर्भात, राज्य शासनाच्या विरोधात दाखल याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे, केवळ १० मानाच्या पालख्याच आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जातील असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.
पंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली. सरकारने विदर्भासोबत भेदभाव केला हा याचिकाकर्त्यांचा आरोप निराधार असल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे, आषाढी एकादशीचा सोहळा यंदाही साधारपणे आणि मानाच्या पालख्यांच्या उपस्थितच पार पडणार आहे.
बसमधून जाणार पालख्या
प्रत्येक पालखीला दोन बसमधून ६० वारकऱ्यांसह प्रवास करता येणार आहे. मात्र, ६० वारकऱ्यांची नवे ही त्या-त्या संस्थानने निश्चित करण्याचा निर्णय घ्यायची आहे. त्यामुळे यंदाही वारीचा सोहळा वाखरी तळापर्यंत एसटी बसनेच होणार आहे. देहू येथून जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा १ जुलै रोजी, तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा २ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे.
६० वारकऱ्यांना प्रवासाची मुभा
जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही एसटी बसनेच होणार आहे. मात्र, मागील वर्षी केवळ २० वारकऱ्यांना प्रवासाची मुभा दिली होती. यंदा मात्र, त्यात वाढ करून दोन बसमधून ६० वारकऱ्यांना परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, प्रत्येक वारकऱ्याची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे.
10 मानाच्या पालख्यांनाच परवानगी
संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत चांगा वटेश्वर, संत निळोबाराय, संत नामदेवराय आधी राज्यातील दहा पालखी सोहळ्याला प्रत्येकी दोन बसमधून ६० वारकऱ्यांना वाखरी तळापर्यंत प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.