माणुसकी जपलेला स्वरांचा हा सम्राटच
By admin | Published: October 27, 2014 12:29 AM2014-10-27T00:29:01+5:302014-10-27T00:29:01+5:30
काही वृक्ष फुले देतात तर काही रसरशीत फळे. अशा दोन्हीही वैशिष्ट्यांसह कायम सळसळत असलेला एक महान स्वरवृक्ष म्हणजे सर्वपरिचित अष्टपैलू कलावंत गुरुवर्य सूरमणी पं. प्रभाकर धाकडे!
डॉ. नारायणराव मंग्रुळकर : सूरमणी पं. प्रभाकरराव धाकडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा
नागपूर : काही वृक्ष फुले देतात तर काही रसरशीत फळे. अशा दोन्हीही वैशिष्ट्यांसह कायम सळसळत असलेला एक महान स्वरवृक्ष म्हणजे सर्वपरिचित अष्टपैलू कलावंत गुरुवर्य सूरमणी पं. प्रभाकर धाकडे! या आंतरराष्ट्रीय कीर्तीमान कलावंताच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शिष्य परिवारातर्फे त्यांचा भव्य आत्मिय सत्कार समारंभाचे आयोजन आज आय. एम. ए. सभागृहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संगीततज्ज्ञ डॉ. नारायणराव मंग्रुळकर तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ विचारवंत अशोक गोडघाटे, आॅक्सफर्ड स्पीकर अकादमीचे संचालक संजय रघटाटे उपस्थित होते. याप्रसंगी पं. प्रभाकर धाकडे व उर्मिला धाकडे यांचा नेत्रदीपक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुरुजींच्या सांगितीक कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘स्वरप्रवाह या गौरवग्रंथाचे प्रामुख्याने प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी हृदय चक्रधर रचित आणि श्रीकांत पिसे यांनी स्वरबद्ध केलेले गुरुजींच्या अभीष्टचिंतनाचे सुमधुर गीत ‘कशी लाभली सूरमोहिनी गुरुजी तुमच्या करस्पर्शाने...’ विद्यार्थ्यांनी सादर केले. महापौर प्रवीण दटके यांनी गुरुजींबद्दल भावना व्यक्त करताना त्यांच्या संगीत सेवेबद्दल कृतज्ञतापूर्वक आदर व्यक्त केला. गुरुजींसारखे महान कलावंत संपूर्ण जगात नागपुरचे नाव मोठे करीत असताना त्यांना मोठे करण्याचे उत्तरदायित्व नागपूरकरांचेही आहे. संगीत क्षेत्रात नागपूर - विदर्भाचे योगदान फार मोठे आहे. कवी राजा बढे, ग्रेस, भट अशा महान प्रतिभावंतांनी कलाक्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. लौकिक प्रसिद्धीपासून वंचित असलेल्या कलावंतांना प्रकाशात आणण्यासाठी स्वागतार्ह सूचनांचा स्वीकार मनपातर्फे करण्यात येईल, असे आश्वासन देत दटके यांनी गुरुजींना शुभेच्छा दिल्यात.
अशोक गोडघाटे यांनी धाकडे कुटुंबीयांच्या सांगितीक योगदानाचा समर्पक आढावा घेत भावी जीवन प्रवासाबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. नारायण मंग्रुळकर यांनी एक माणुसकी असलेला, जपलेला हा स्वरांचा सम्राट असल्याचे मत व्यक्त केले. संगीत सुरेल होण्यासाठी वादी - संवादी स्वर जसे महत्वाचे असतात, तसेच जीवनसंगीत सुरेल होण्यासाठी पं. धाकडे यांना संसारात लाभलेली उर्मिला यांची साथ तेवढीच महत्त्वाची आहे, असे मत व्यक्त करताना त्यांनी धाकडे गुरुजींना शुभेच्छा दिल्यात. पं. धाकडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एवढे भव्य आयोजन केल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. कुठलाही कलावंत हा जन्मभर विद्यार्थीच असतो.
याच भावनेतून प्रत्येकाने आपल्या गुरुंबद्दल आदर बाळगून संगीतसाधना सातत्याने कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर गुरुजींच्या विद्यार्थ्यांनी सुमधुरतेने सादर केलेल्या हिंदी - मराठी गीतांच्या कार्यक्रमाने या समारंभाला उंची प्रदान केली. देवाशिष दास, तिलोत्तमा इंगळे, मानसी देशपांडे, संजय तलवार, शरद आटे, प्रीती धाकडे, सृष्टी सेन, रसिका करमाळेकर, गायत्री मजुमदार, मोहिनी बर्डे, मिलिंद जिभे, श्रेया खराबे, श्याम जैन, छाया वानखेडे, मोनिका देशमुख, प्रीती गजभिये, पराग काळीकर, अहिंसा तिरपुडे यांनी यावेळी गीते सादर केलीत. प्रमोद बावणे, भूपेश सवाई, श्रीकांत पिसे, योगेश हिवराळे यांनी विविध वाद्यांवर गायकांना सुयोग्य साथ केली. प्रास्ताविक शरद आटे यांनी केले. निवेदन महेश तिवारी यांनी तर आभार छाया वानखेडे यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. (प्रतिनिधी)