नफ्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनिअरला ३८ लाखांनी गंडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:54 PM2023-01-10T12:54:59+5:302023-01-10T12:55:58+5:30
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले असताना सामान्य जनतेने सावध राहावे असे आवाहन अनेक संगणक अभियंत्यांकडून करण्यात येते. मात्र, नफ्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी चक्क एका आयटी इंजिनिअरचीच तब्बल ३८ लाख रुपयांची फसवणूक केली. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रविकांत रंगारी (४१, शिव हाइटस्) हे ‘वर्क फ्रॉम होम’ करतात. त्यांना १९ एप्रिल २०२२ रोजी आलिषा नामक महिलेचा फोन आला व तिने गुंतवणुकीच्या योजनांबाबत माहिती दिली. त्यानंतर इन.क्रिएटवेल्थ.कॉम या संकेतस्थळाचे अधिकारी असल्याचे भासवत डॅनिअल व जॉन थॉम्पन यांचेदेखील त्यांना वेळोवेळी आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून फोन आले. गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल अशी त्यांनी बतावणी केली. त्यांच्यावर विश्वास ठेवून रविकांत यांनी गुंतवणूक केली व त्यांना आरोपींनी चांगला नफादेखील दिला. त्यामुळे रविकांत यांचा विश्वास आणखी वाढला.
जास्त रक्कम गुंतविण्याचे आमिष आरोपींनी दिले व नफ्यातील ३० टक्के रक्कम कमिशन असेल असे सांगितले. रविकांत यांनी १५ लाख रुपये गुंतवणूक केली व त्यावर १ कोटी २३ लाखांचा नफा झाल्याचे ऑनलाइन यंत्रणेत दिसून आले. आरोपींनी त्यांना कमिशनची मागणी केली व रविकांत यांनी ३८ लाख १३ हजार रुपये आरोपींना ऑनलाइन माध्यमातूनच दिले. मात्र, त्यानंतर फसवणूक झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तीनही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.