संत्रानगरीत जणू अवतरली अयोध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 08:50 PM2020-08-05T20:50:01+5:302020-08-05T21:59:09+5:30
... ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाव वरानने’ तनाने जरी लोक नागपुरात असले तरी मनाने ते कधीच शरयूकिनारी असलेल्या अयोध्येला पोहोचले होते. अखेर तो मुहूर्त आला अन् असंख्य नागपूरकरांच्या डोळ्यात विलक्षण समाधानाचे आनंदाश्रू तरळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईश्वरीय अनुभूती देणाऱ्या ‘रामधून’चे सकाळपासूनच गुंजणारे स्वर, चौकाचौकात मर्यादा पुरुषोत्तमाची प्रतिमा, कुठे डोळ्यांना विलक्षण अनुभव देणारे रांगोळीचे सौंदर्य तर कुठे जणू सणच असल्याचा भास करवून देणारी रोषणाई. चौकात राम, घरात राम इतकेच काय तर मनामनातदेखील रामच राम. आबालवृद्धांच्या तोंडी स्तोत्र... ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाव वरानने’ तनाने जरी लोक नागपुरात असले तरी मनाने ते कधीच शरयूकिनारी असलेल्या अयोध्येला पोहोचले होते. अखेर तो मुहूर्त आला अन् असंख्य नागपूरकरांच्या डोळ्यात विलक्षण समाधानाचे आनंदाश्रू तरळले.
मागील काही महिन्यापासून कोरोनाचा सामना करत असलेल्या नागपूरसाठी बुधवारचा दिवस अनोखाच ठरला. एकीकडे अयोध्येत श्रीरामजन्मभूमीत मंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातदेखील प्रचंड उत्साह दिसून आला. या ऐतिहासिक घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होता आले नसले तरी तो आनंद अनुभवण्याची कुठलीही कसर नागपूरकरांनी मागे ठेवली नाही.
मंगळवारपासूनच शहरातील प्रमुख चौकांमध्ये तयारी करण्यात आली होती. काही चौकात तर मंदिराची प्रतिकृतीच उभारण्यात आली होती. शिवाय श्रीराम मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून सकाळीच पूजन करण्यात आले. यात छापरुनगर चौक, प्रतापनगर चौक, माटे चौक, लक्ष्मीभुवन चौक, बडकस चौक इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय शहरातील ३०० ठिकाणी रामधून वादन करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी उत्साही नागरिकांनी मिठाईचेदेखील वाटप केले.
मर्यादेचे पालन
श्रीरामाची ओळख मर्यादा पुरुषोत्तम अशीच आहे. अशा आराध्य देवतेच्या मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी रामभक्त तसेच नागरिकांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या मर्यादेचे पालन केले. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. घरोघरी भगवे ध्वज लावण्यात आले होते व सायंकाळच्या वेळी घरांसमोर दिवेदेखील लावण्यात आले.
संघ मुख्यालयात रोषणाई
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रोषणाई करण्यात आली होती. याशिवाय मुख्यालयासमोर सकाळीच मोठी रांगोळी साकारण्यात आली. रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातदेखील रोषणाई करण्यात आली होती व स्वयंसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विश्व हिंदू परिषदेतर्फे महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राष्ट्रसेविका समितीतर्फे रामपूजन
राष्ट्रसेविका समितीतर्फे केंद्रीय कार्यालय असलेल्या अहल्या मंदिरात रामपूजन करण्यात आले. समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता
अन्नदानम् यांच्या उपस्थितीत हे पूजन झाले. अयोध्येत इतिहास रचला गेला आहे. या माध्यमातूनच देशाच्या अस्मितेचे पुनर्जागरण झाले आहे. या भूमिपूजनामुळे भारतात स्वाभिमान व आत्मनिर्भरतेच्या एका नव्या युगाला सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन सीता अन्नदानम् यांनी केले.
भजन-कीर्तनाचे आयोजन
विविध संघटनांतर्फे बुधवारी भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. इतकेच काय तर काही चौकांमध्येदेखील असे आयोजन झाले. लक्ष्मीभुवन चौकात रामनामाचा जप झाला. यावेळी श्रीरामासह सीता, हनुमान यांच्या प्रतिमादेखील स्थापित करण्यात आल्या होत्या.
स्वयंसेवकांनी काढली रामधून यात्रा
सकाळच्या सुमारास शिवाजीनगरसह शहरातील काही भागात संघ स्वयंसेवक व नागरिकांनी रामधून यात्रा काढली. यावेळी रामनामाचा जप करण्यात आला. विशेष म्हणजे यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
भाजपतर्फे चौकाचौकात आनंदोत्सव
दरम्यान, भाजपतर्फे शहरातील विविध चौकात सजावट करण्यात आली होती. पक्षाच्या विविध नेत्यांनी जागोजागी रामपूजन केले. काही चौकात रामधून वाजविण्यात आली. त्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. बडकस चौक, लक्ष्मीभुवन चौक, छापरुनगर चौक, प्रतापनगर चौक, मानेवाडा चौक, अयोध्यानगर येथे नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बडकस चौकात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. भाजयुमो पश्चिम नागपूरतर्फे रामपूजन करण्यात आले. वर्धमान नगरातदेखील मोठे आयोजन करण्यात आले.
मिठाईचेदेखील वाटप
शहरात जागोजागी मिठाईचेदेखील वाटप करण्यात आले. नवीन सुभेदार ले-आऊट येथे मित्र परिवारातर्फे २१ किलो बुंदीचे वाटप करण्यात आले. तर अयोध्यानगर श्रीराम मंदिरातदेखील पूजनानंतर लाडू वाटप करण्यात आले.