पहिले लग्न कायम असताना दुसरे लग्न करणे अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:52+5:302020-12-17T04:36:52+5:30
नागपूर : पहिले लग्न कायम असताना दुसरे लग्न करणे अवैध आहे असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे ...
नागपूर : पहिले लग्न कायम असताना दुसरे लग्न करणे अवैध आहे असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी दिला.
वायुसेनेच्या नागपूर युनिटमधील चौकीदार दुर्गय्या पोचम सुल्लेवार यांनी पहिली पत्नी अरुणा हिच्यासोबतचे लग्न कायम असताना लक्ष्मीबाईसोबत दुसरे लग्न केले. तसेच, सर्व्हिस रेकॉर्डमध्ये लक्ष्मीबाईचा नॉमिनी म्हणून समावेश केला. त्यामुळे अरुणाने कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने ती याचिका मंजूर करून अधिकृत पत्नी या नात्याने अरुणा ही एकमेव नॉमिनी आहे आणि लक्ष्मीबाईचा नॉमिनी म्हणून समावेश अवैध आहे असे आदेश दिले. त्याविरुद्ध दुर्गय्या व लक्ष्मीबाईने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता पहिले लग्न कायम असताना दुसरे लग्न करणे अवैध आहे असा महत्वपूर्ण निर्णय दिला व कुटुंब न्यायालयाचे आदेश कायम ठेवून दुर्गय्या आणि लक्ष्मीबाईचे अपील फेटाळून लावले. पत्नी विभक्त झाल्यामुळे लग्न आपोआप रद्द होत नाही असेही उच्च न्यायालयाने सांगितले.
--------------
पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ
दुर्गय्या व अरुणा यांचे ११ जुलै १९७९ रोजी हिंदू पद्धतीने लग्न झाले. त्यानंतर त्यांनी तीन मुलांना जन्म दिला. दुर्गय्या अरुणाचा हुंड्यासाठी छळ करीत होता. तिला सतत मारहाण व शिवीगाळ करीत होता. १० सप्टेंबर १९९४ रोजी त्याने अरुणाला घराबाहेर काढून दिले. तसेच, तिला घटस्फोट न देता २ फेब्रुवारी १९९५ राेजी लक्ष्मीबाईसोबत दुसरे लग्न केले.