अभ्यास किती केला यापेक्षा कसा केला हे महत्त्वाचे

By Admin | Published: May 13, 2016 03:16 AM2016-05-13T03:16:10+5:302016-05-13T03:16:10+5:30

‘युपीएससी’ची परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात.

It is important to know how to do more than study | अभ्यास किती केला यापेक्षा कसा केला हे महत्त्वाचे

अभ्यास किती केला यापेक्षा कसा केला हे महत्त्वाचे

googlenewsNext

‘लोकमत’ व्यासपीठावर भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यशोमंत्र : आत्मविश्लेषण करण्याचा सल्ला
नागपूर : ‘युपीएससी’ची परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. परंतु यश मिळविण्यासाठी दररोज १४ ते १८ तास अभ्यास करावाच लागेल व ते आपल्याला जमेलच की नाही, याबाबत त्यांना साशंकता असते. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत तर लागतेच. परंतु अमूकतमूक तास अभ्यास करण्यापेक्षा आहे त्या वेळात दर्जेदार अभ्यास करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. ‘युपीएससी’च्या निकालात यश मिळविणाऱ्या उमेदवारांनी ‘लोकमत व्यासपीठ’च्या माध्यमातून यशाचा हा मंत्र दिला आहे.

या आठवड्यातच ‘युपीएससी’च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर चांगली ‘रँकिंग’ मिळविलेल्या उमेदवारांनी गुरुवारी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व संपादकीय सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. या भावी अधिकाऱ्यांमध्ये अश्विनी कुमार पांडे (क्र. ३४), सत्यप्रकाश (क्र. २३७), तोरल रविश (क्र. ४९), श्रीवत्स सेहरा (क्र. ९२) व अभिनव गोयल (क्र. ३६) यांचा समावेश होता. यावेळी या सर्व यशस्वी उमेदवारांनी आपल्या यशाचे रहस्य तर सांगितलेच, शिवाय भविष्यातील संकल्पनादेखील मांडल्या. हे सर्व उमेदवार नागपूरच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण घेत आहेत, हे विशेष. कुठल्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यकच असते. ‘युपीएससी’ची परीक्षा देण्याची तयारी सुरू करण्याअगोदर विद्यार्थ्यांनी स्वत:च्या क्षमतेचे परीक्षण करणे जास्त आवश्यक आहे. यातून समोरची दिशा स्पष्ट होऊ शकते. विशेष म्हणजे यातून स्वत:मधील कमतरता आणि त्रुटी लक्षात येतात. त्यांना दूर करून तयारीला सुरुवात करणे कधीही चांगले असते, असे मत या उमेदवारांनी व्यक्त केले.


सुरुवात करणे जास्त महत्त्वाचे
परीक्षेची तयारी करताना सुरुवातीपासूनच अनेक अडथळे येतात. सर्वात मोठा प्रश्न हा असतो की, अभ्यासाची नेमकी सुरुवात कुठून करायची. याशिवाय काय वाचावे, कुठली पुस्तके घ्यावीत, यासारखे प्रश्नदेखील असतात. या संभ्रमावस्थेतच बराच वेळ जातो. त्यामुळे संभ्रमात फसण्याऐवजी आहे तिथून अभ्यासाला सुरुवात करणे कधीही श्रेयस्कर ठरते, असे या पाचही यशस्वी उमेदवारांचे म्हणणे होते.
नागपूर खरोखरच ‘गुड सिटी’
‘यूपीएससी’च्या परीक्षेत यश मिळविलेले हे पाचही उमेदवार केंद्रीय प्रत्यक्ष कर अ‍ॅकेडमी येथे भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण घेत आहेत. आता यातील चौघे जण भारतीय प्रशासकीय सेवेत जाणार आहेत. गेल्या ५ महिन्यांत या सर्वांना नागपूरने आपलेसे केले आहे. नागपूरची शांती, येथील हिरवळ, स्वच्छता यांच्या प्रेमातच पडले आहेत. या शहराने नवा हुरूप दिला व आयुष्यभर येथील आठवणी स्मरणात राहतील, अशा भावना या यशस्वी उमेदवारांनी व्यक्त केल्या.

‘कोचिंग क्लास’चा आग्रह नको
परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये सर्वसाधारणपणे एक समज असतो की यश मिळविण्यासाठी महागडे ‘कोचिंग क्लास’ लावणे आवश्यकच असते. परंतु ‘कोचिंग क्लास’मुळे फारसा फायदा होत नाही. उलट अनेकदा तर वेळच वाया जातो. त्यांच्याशिवायदेखील अनेक उमेदवार सहजपणे यश मिळवितात. तेथे काहीही नवीन शिकायला मिळत नाही. याउलट उमेदवारांनी स्व-अभ्यासावर जास्त भर दिला पाहिजे, असा सल्ला या सर्व उमेदवारांनी दिला.

महिलांना सक्षम बनविण्यावर भर
परंपरेला छेद देत करिअरसाठी भारतीय प्रशासकीय सेवेची निवड करणाऱ्या तोरल रविशने आपली निवड योग्य असल्याचे सांगितले. भारतीय प्रशासकीय सेवेत काम करत असताना खासगी व व्यावसायिक जीवनाचा समतोल साधता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाची सेवा करता येते. आपल्या देशात महिलांचा विकास होण्यासाठी अभ्यास व आरोग्यक्षेत्रांवर भर देण्याची गरज आहे. लोकसेवक म्हणून काम करताना यावरच माझा भर राहील. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे आवश्यक आहे. यातून त्यांच्यात आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण होतो. ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी अल्पबचत गट हे मोठे माध्यम ठरू शकते. यादृष्टीनेच माझे प्रयत्न राहतील.
-तोरल रविश
अखिल भारतीय क्रमांक : ४९

Web Title: It is important to know how to do more than study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.