वात्सल्याने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला विसरता येणे अशक्य
By admin | Published: June 19, 2015 02:45 AM2015-06-19T02:45:22+5:302015-06-19T02:45:22+5:30
शोभाताई उबगडे यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे नुकसानच झाले नाही तर अनेकांचा प्रेरणास्रोत हरविला आहे.
नागपूर : शोभाताई उबगडे यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे नुकसानच झाले नाही तर अनेकांचा प्रेरणास्रोत हरविला आहे. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. साहित्य क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या उबगडे यांचे जाणे सहजासहजी पचवता येण्यासारखे नाही. वात्सल्याने वागणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला विसरता येणे अशक्य असल्याचे मत यावेळी शोकसभेत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने सांस्कृतिक संकुलातील सभागृहात शोभाताई उबगडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष वामन तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सुरेश द्वादशीवार म्हणाले, शोभातार्इंच्या निधनाने ही संस्था खचली आहे. सोज्वळ, शालीन कार्यकर्त्या म्हणून त्या सातत्याने या संस्थेत वावरल्या. ही संस्था म्हणजेच त्यांचे कुटुंब होते. संस्थेच्या परीक्षा समितीचे काम त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या निधनाने संस्थेचे फार मोठे नुकसान झाले आहे.
ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग म्हणाले, शोभाताई या संस्थेची शुभशक्ती होती. त्यांचा वावर सुखद होता. संस्थेत आलेल्या प्रत्येकाची गरज ओळखून त्यांना मदत करण्यात शोभाताई नेहमीच अग्रेसर होत्या. त्या उत्तम लेखिका होत्या. सुप्रिया अय्यर, मेघना वाहोकार यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या.
डॉ. विलास चिंतामण देशपांडे म्हणाले, मराठी भाषेतील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. अमराठी लोकांसाठी त्यांनी मराठीचे वर्ग चालविले. त्यांचे दातृत्व आणि औदार्य यांचा अनुभव आम्हाला वेळोवेळी आला आहे. उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, त्या कर्तव्यदक्ष गृहिणी आणि संस्थेतही वात्सल्याने वागणाऱ्या माता आणि प्रसंगी कान पकडणाऱ्या बापाच्या भूमिकेतही होत्या. त्यांचे जाणे आम्हाला पांगळे करणारे आहे. मधुकर कुकडे म्हणाले, अखंड महाराष्ट्र समितीच्या कार्यात त्यांना रस होता. त्यांचे जाणे एका मातेचे जाणे आहे. यावेळी गणेश नायडू, सुरुची डबीर, श्यामकांत कुळकर्णी यांनीही मत व्यक्त केले.
वामन तेलंग म्हणाले, शोभाताई संस्थेच्या सरचिटणीस नव्हे पालकही होत्या. संस्था वाढविण्यात आणि माणसे जोडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
प्रतिभावंत लेखक असलेल्या शोभातार्इंच्या जाण्याने पोरके वाटते. याप्रसंगी एक मिनिट मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)