वैदर्भीयांचे प्रेम विसरणे अशक्य; अनुप कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:12 AM2018-08-28T11:12:44+5:302018-08-28T11:13:18+5:30
वैदर्भीय नागरिकांचे हे प्रेम विसरणे माझ्यासाठी अशक्य आहे, अशी भावनिक कबुली पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी येथे दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सनदी अधिकारी म्हणून मी विदर्भात अनेक वर्षे घालवली. यादरम्यान मला शासनासोबतच जनतेचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले. यासोबतच येथील नागरिकांचे प्रेमही भरभरून मिळाले. वैदर्भीय नागरिकांचे हे प्रेम विसरणे माझ्यासाठी अशक्य आहे, अशी भावनिक कबुली पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी येथे दिली
सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये सोमवारी आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी त्यांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले.
अनुप कुमार यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त म्हणून तब्बल साडेचार वर्षाचा सर्वाधिक कालावधी मला मिळाला. यापूर्वी मी बुलडाण्याचा सीईओ म्हणूनही काम केले. तसेच अकोला जिल्हाधिकरी, महाबीज येथेही कार्य केले आहे. सरकारने माझ्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदरी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. नागपूर व विदर्भातील माझा कार्यकाळ समाधानकारक असा राहिला आहे.
पूर्वी विदर्भाबाबत अनेक गैरसमज होते. विदर्भ म्हणजे मागास भाग. मुंबईने सरकारला कमावून द्यावे आणि तो पैसा विदर्भात खर्च करावा, अशा अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण आता तसे नाही.
गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाचा लाभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वप्न पाहणारे व ते पूर्ण करणारे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे व सुधीर मुनगंटीवारसारखे नेतृत्वही नागपूर विदर्भाला लाभल्याने त्याचे फायदे दिसून येत आहेत. चार वर्षात भरपूर कामे झाली. गतीने झाली. नागपूरचे आऊटलेट पूर्णपणे चेंज झाले आहे. नागपूर मेट्रो ही पुण्यातील मेट्रो बनवणार आहे. काही वर्षांपर्यंत ही कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती, असे अनुप कुमार यांनी सांगितले.
विदर्भ-मराठवाडा फोकस राहणारच
यापुढेही काम करताना विदर्भ व मराठवाडा हा फोकस राहिलच. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे शासनाचे धोरण आहे. ते राबवीत असताना आपण केवळ शेतकरीच नव्हे तर ग्रामीण भागात राहणाºया प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर काम करू, असेही ते म्हणाले.