सातवा वेतन आयोग देणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:10 AM2017-10-09T01:10:29+5:302017-10-09T01:10:41+5:30
एसटी महामंडळाचे उत्पन्न सात हजार कोटींचे असून, सातव्या वेतन आयोगामुळे १२ हजार कोटींचा बोजा महामंडळावर पडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाचे उत्पन्न सात हजार कोटींचे असून, सातव्या वेतन आयोगामुळे १२ हजार कोटींचा बोजा महामंडळावर पडणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील संघटनांनी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी दिलेला संपाचा इशारा आडमुठेपणाचा आहे, असे मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.
नागपूर-भंडारा शिवशाही बसच्या उद्घाटनप्रसंगी गणेशपेठ बसस्थानकावर दिवाकर रावतेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, एसटी महामंडळ तोट्यात आहे. अवैध वाहतुकीचा फटका महामंडळाला संपूर्ण महाराष्ट्रात बसत आहे. अधिकारीही पारंपरिक चौकटीत राहून काम करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने लोकल फेºया सुरू करून १५ मिनिटात एसटी बस उपलब्ध करून देणे सुरू केले आहे. त्यासाठी लांब पल्ल्याच्या फेºया कमी केल्या आहेत. शिवशाही बसचे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे आहेत. शिवशाही बसमध्ये प्रवाशांना हव्या असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. डिसेंबरपर्यंत आणखी १२०० बसेस येणार आहेत. एसटी महामंडळाला खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेत उतरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रावते यांनी सांगितले. नागपूर-भंडारा शिवशाही बसला हिरवी झेंडी दाखवून त्यांनी रवाना केले. यावेळी एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक अनंत मुंडीवाले, विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई, विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडस्कर, विभागीय अभियंता सतीश कटरे, घाट रोड डेपोचे आगारप्रमुख अशोक वाडीभस्मे उपस्थित होते.
पक्ष शिस्त मोडू नका
शिवसेनेचे विदर्भाचे संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांनी रविवारी दुपारी रविभवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पक्षशिस्त मोडणाºयांचे कान टोचले. काही लोक पक्षाची बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. हे बरोबर नाही. मतभेद विसरून कामाला लागा. गटबाजी दिसता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत काही कार्यकर्त्यांनी मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर रावते म्हणाले, कशाला हवा मानसन्मान. काम करत रहा. काम केले की मानसन्मान आपोआपच मिंळतो. यावेळी खासदार कृपाल तुमाने, माजी आमदार आशिष जैस्वाल, राजू हरणे, संदीप इटकेलवार, नितीन तिवारी, ओंकार पारवे, गुड्डू रहांगडाले, किशोर कुमेरिया, शेखर सावरबांधे, मंगला गवरे, सुरेखा खोब्रागडे, संजना देशमुख आदी उपस्थित होते.
आमदारांना निमंत्रण नाही
परिवहन मंत्री रावतेंच्या उपस्थितीत शिवशाही आरामदायी बससेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. हा शासकीय कार्यक्रम असतानाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आमदारांना देण्यात आले नाही. यावर स्थानिक आमदारांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, या कार्यक्रमाची साधी निमंत्रण पत्रिकाही आम्हाला मिळाली नाही. आमदारांना अंधारात ठेवून कार्यक्रम उरकण्यात आला, अशी नाराजी खोपडे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कामठीतील कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. निमंत्रण पत्रिकेतही त्यांचे नाव नव्हते. त्यावर तुमाने यांनी आक्षेप घेत संसदेत हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला होता. या दोन्ही घटनाक्रमांमुळे भाजप व शिवसेनेत एकमेकांना डावलण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येते.
समारंभपूर्वक बससेवेचे उद्घाटन केले नाही
शिवशाही बसच्या शुभारंभप्रसंगी आमदारांना निमंत्रण टाळण्याबाबत विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांना विचारणा केली असता ते म्हणाले, शिवशाही बससेवेचे उद्घाटन यापूर्वीच झालेले आहे. नागपूर-भंडारा बससेवा सुरू करून एसटी महामंडळाने या सेवेचा विस्तार केला आहे. भंडारा-नागपूर बससेवेचा शुभारंभ शनिवारी झाल्यानंतर रविवारी नागपूर-भंडारा बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. परिवहन मंत्री दिवाकर रावते नागपुरात हजर असल्यामुळे त्यांनी याप्रसंगी उपस्थित राहून बसला हिरवी झेंडी दाखविली. प्रत्यक्षात बसची फितही मीच कापली. समारंभपूर्वक केलेला हा सोहळा नसल्यामुळे याचे निमंत्रण कुणालाच देण्यात आलेले नव्हते.
- सुधीर पंचभाई, विभाग नियंत्रक.