आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत राहणे अशक्य
By Admin | Published: August 17, 2015 02:57 AM2015-08-17T02:57:59+5:302015-08-17T02:57:59+5:30
मनात येईल तेव्हा आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणे पतीला अशक्य आहे...
हायकोर्ट : आंतरजातीय विवाह करणाऱ्या पतीला घटस्फोट
नागपूर : मनात येईल तेव्हा आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणे पतीला अशक्य आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.
याप्रकरणात आंतर जातीय विवाह करणाऱ्या पतीला पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय वैध ठरविण्यात आला आहे. संबंधित पत्नीने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, ती सासरच्या सदस्यांना खोट्या फौजदारी प्रकरणात अडकविण्याची धमकी देत होती.
सविता व सतीश (काल्पनिक नावे) यांनी आंतरजातीय विवाह केला होता. सतीश ब्राह्मण असून सविता बौद्ध आहे. दोघेही नागपूर येथील रहिवासी व व्यवसायाने डॉक्टर आहेत. शासकीय दंत महाविद्यालयात शिकत असताना त्यांचे प्रेम झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १८ नोव्हेंबर १९९४ रोजी त्यांचे लग्न झाले. यानंतर काही महिन्यांतच सविता क्रूरतेने वागायला लागली. एकदा तिने दिराला मारहाण केली व सासऱ्यावर हात उगारला.
ती रोडवर उभी राहून सासरच्या सदस्यांना मानहानीजनक शिविगाळ करीत होती.
ती स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आगपेटीसह घराबाहेर पडली होती. २८ जून १९९६ रोजी तिने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
सतीशने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात सविताने लेखी बयान सादर करून सर्व आरोप फेटाळून लावले होते. सतीशचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्याला घटस्फोट हवा आहे असे तिचे म्हणणे होते. परंतु, तिला स्वत:चे म्हणणे पुराव्यांसह सिद्ध करता आले नाही. तिचे आरोप खोटे व आधारहीन ठरले. १४ डिसेंबर २००१ रोजी नागपूर कौटुंबिक न्यायालयाने सतीशची याचिका स्वीकारून घटस्फोट मंजूर केला.
याविरुद्ध सविताने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांनी प्रकरणातील एकंदरीत तथ्ये लक्षात घेता कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून सविताचे अपील फेटाळून लावले.(प्रतिनिधी)