नागपूरच्या वातावरणात झाडांचे प्रत्याराेपण अशक्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:33+5:302021-06-04T04:07:33+5:30
मेहा शर्मा नागपूर : केंद्रीय भुपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ट्वीट करीत अजनी आयएमएस प्रकल्पासाठी कमी हाेणाऱ्या झाडांच्या ...
मेहा शर्मा
नागपूर : केंद्रीय भुपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ट्वीट करीत अजनी आयएमएस प्रकल्पासाठी कमी हाेणाऱ्या झाडांच्या बदल्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे शंकरपूर वनक्षेत्रात पाचपट झाडे लावण्यात येईल, असे जाहीर केले. शिवाय झाडे कापली जाणार नाही तर त्यांचे प्रत्याराेपण (ट्रान्सप्लॅन्टेशन) करण्यात येईल, असे स्पष्ट केले. मात्र तज्ज्ञांच्या मते नागपूरच्या वातावरणात झाडांचे प्रत्याराेपण अशक्य आहे. शिवाय शहरातील झाडे कापून शहराबाहेर वृक्षाराेपण करण्यात अर्थ काय? असा सवालही विचारण्यात येत आहे.
नागपूर शहराचे तापमान सातत्याने वाढत आहे. अशावेळी एनएचएआयने सुचविलेले पर्याय शहराच्या परिस्थितीत प्रॅक्टिकल आहेत काय? शहरातील हिरवे फुप्फुस म्हणजे वनसंपदा नष्ट करणे नागरिकांसाठी कसे लाभदायक ठरेल? ताेडणाऱ्या झाडांच्या बदल्यात शंकरपूरच्या जंगलात पाचपट वृक्षाराेपण करण्याचा पर्याय मान्य केला तरी शहरातील झाडे कापल्याने हाेणारे ऑक्सिजनचे नुकसान कसे भरून निघेल, असे अनेक प्रश्न निर्माण हाेत आहेत.
या पर्यायाबाबत चर्चा केली असता ग्रीन व्हीजीलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी म्हणाले, एनएचएआय प्रत्याराेपणासाठी काेणते तंत्र वापरेल हे माहिती नाही पण नागपूरच्या उष्ट आणि शुष्क वातावरणात झाडांचे प्रत्याराेपण करणे अशक्य आहे. अशी एका जागेवरून काढून दुसऱ्या जागेवर लावलेल्या झाडांचा जगण्याचा दर शून्य आहे. हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वीही महामेट्राेच्या कामादरम्यान कापण्यात आलेली झाडे पटवर्धन मैदान आणि अमरावती राेडवर प्रत्याराेपित करण्याचा प्रयत्न झाला हाेता, पण त्यातील सर्व झाडे मृत पावली. प्रत्याराेपण म्हणजे झाडे जशाचे तसे जगतात, असे नव्हे. ज्याप्रमाणे १:५च्या दराने कम्पेनसेटरी प्लॅन्टेशन केले जाते त्याप्रमाणे १:५ दराने झाडांचे प्रत्याराेपण करणे गरजेचे आहे.
दरम्यान, पाचपट वृक्षाराेपणबाबतही त्यांनी काही गाेष्टी स्पष्ट केल्या. शहराबाहेर झाडे लावल्याने शहरातील ऑक्सिजनचे नुकसान हाेईल, हा गैरसमज आहे. शहरात झाडे असाे अथवा नाही, ऑक्सिजनचा स्तर सारखाच असताे, जाे २१ टक्के आहे. मात्र झाडांचे ऑक्सिजनऐवजीही वातावरणातील प्रदूषण शाेषून घेणे, वाढलेले तापमान नियंत्रित करणे असे अनेक फायदे आहेत. त्यामुळे शहरातील कापलेली झाडे सभाेवताल लावावी. शिवाय ज्या प्रजातीची झाडे कापली त्याच प्रजातीची झाडे लावून समताेल साधला जावा, असे आवाहनही त्यांनी केले. आंबा, चिंच, नीमसारख्या पर्यावरणपूरक झाडांचे राेपण अधिक करावे. शहराची लाेकसंख्या वाढल्याने व जागा नसल्याने उपलब्ध असलेल्या जागेत संबंधित संस्था परवानगी देणार की नाही हा प्रश्न असल्याने शहराबाहेर वृक्षाराेपण करण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.