पद मिळाले नाही तर वाईट वाटणे साहजिक, पण आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 07:44 IST2024-12-21T07:44:08+5:302024-12-21T07:44:35+5:30
शिवतारे, सुर्वे, भोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचा दावा; जसे 'लाडका भाऊ' हे मोठे पद वाटते, त्याचप्रमाणे यांना ' शिंदे यांचा विश्वासू सहकारी' हे पद महत्त्वाचे.

पद मिळाले नाही तर वाईट वाटणे साहजिक, पण आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही: एकनाथ शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आम्ही शिंदेसेना नावाच्या कुटुंबाचा भाग असून, या परिवारापासून कुणीही वेगळे होणार नाही. पक्षात कुणीही नाराज नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
एखादे पद मिळाले नाही, तर वाईट वाटणे साहजिक आहे. काही जणांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. मात्र, याचा अर्थ कुणी नाराज आहे, असे नाही. तीनही आमदार माझ्यासोबत असून, कुणीही नाराज नाही. यापुढेही सगळे जण मिळून पक्षात एकत्र राहून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदेसेनेचे काही आमदार नाराज होते. विजय शिवतारे, नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. शिंदे यांनी शुक्रवारी या तीनही आमदारांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. काही वेळा पदे येतात व जातात, मंत्रिपदापेक्षा आमच्यातील जिव्हाळ्याचे नाते महत्त्वाचे आहे. जसे मला 'लाडका भाऊ' हे मोठे पद वाटते, त्याचप्रमाणे शिवतारे यांना ' शिंदे यांचा विश्वासू सहकारी' हे पद महत्त्वाचे आहे, असे त्यांनी मला सांगितल्याचे शिंदे म्हणाले.
बीड घटनेतील कुणालाही पाठीशी घालणार नाही
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ही अत्यंत अमानुष असून, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असून, आरोपी कितीही मोठा असला आणि कुणाच्याही जवळचा असला तरीही पाठीशी घातले जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
मराठी कुटुंबाच्या पाठीशी
कल्याणमधील सोसायटीत मराठी कुटुंबासोबत घडलेल्या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी कुटुंबावर हल्ला कदापि खपवून घेणार नाही, असे शिंदे यांनी निक्षून सांगितले.