कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:07 AM2021-04-16T04:07:45+5:302021-04-16T04:07:45+5:30
कोंढाळी : कोंढाळी परिसरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशात काही रुग्ण खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे खासगी ...
कोंढाळी : कोंढाळी परिसरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशात काही रुग्ण खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी कोविडची लक्षणे असलेल्या या रुग्णांची माहिती तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला देणे बंधनकारक आहे. ही माहिती लपविणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी स्पष्ट केले.
कोंढाळी परिसरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोंढाळी पोलीस स्टेशन येथे परिसरातील खासगी डॉक्टरांची बैठक ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांच्या अध्यक्षतेत झाली. तीत ग्रामीण भागातील संक्रमण रोखण्याबाबत करायवाच्या विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, ग्रा.पं. सदस्य संजय राऊत, ब्रिजेश तिवारी व कोंढाळी वैद्यकीय संघटनेचे डॉ. भालचंद्र टावरी, डॉ. हरिभजन धारपुरे, डॉ. कम्मा शेख, डॉ. चाफले आदी याप्रसंगी उपस्थित होते.
कोविडची प्राथमिक लक्षणे असलेले काही रुग्ण खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औैषधोपचार करतात. कोंढाळी परिसरात असे उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती खासगी डॉक्टरांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला द्यावी. त्यामुळे अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे व त्यांच्या चाचण्या करून घेण्यास मदत होईल, असे फुल्लरवार यांनी स्पष्ट केले. या नियमाचे पालन न करणाऱ्या डॉक्टरवर शासन नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.