‘तो’ व्यापारी अद्याप फरार, तांदळाचे नमुने तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:16 AM2019-03-28T00:16:59+5:302019-03-28T00:18:52+5:30
उमरीमार्गे नांदेडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या ट्रक जप्ती प्रकरणातील आरोपी असलेला धर्माबाद येथील व्यापारी अद्याप फरार आहे़ जप्त झालेल्या तांदळाचे नमुने परभणी येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत़
उमरी : उमरीमार्गे नांदेडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या ट्रक जप्ती प्रकरणातील आरोपी असलेला धर्माबाद येथील व्यापारी अद्याप फरार आहे़ जप्त झालेल्या तांदळाचे नमुने परभणी येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत़
२५ टन तांदूळ भरून असलेला ट्रक उमरीमार्गे नांदेडकडे जात असताना उमरी पोलिसांनी पकडला़ २२ मार्च रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली़ (एम़एच़२६-६८३०) या क्रमांकाचा हा ट्रक सध्या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये जप्त करून उभा करण्यात आला आहे़ साडेपाच लाख रुपये किमतीच्या या तांदूळ प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे हे करीत आहेत़ या प्रकरणी चौकशीसाठी त्यांनी धर्माबाद येथे प्रत्यक्ष जावून माहिती घेतली़ आरोपी असलेले व्यापारी शेख अजीम अब्दुल रहीम रा़ बाळापूर ता़ धर्माबाद यांचे धर्माबाद येथे अडत दुकान आहे़ मात्र ते दुकानात आढळून आले नाहीत़ त्यांचा भाऊ पोलीस अधिकाऱ्यांना भेटला़ ट्रकचालक रमेश लालू वाघमारे (रा़ नावंदी ता़ नायगाव) याच्याकडे सदर तांदळाच्या खरेदी पावत्या किंवा माल पोचविण्यासाठीचे संबंधित व्यापा-याचे पत्र अशी कुठलीच कागदपत्रे आढळून आली नाहीत़ म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सुर्वे यांनी दिली़
उमरी पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकमधील तांदूळ स्वस्त धान्याचाच आहे का इतर कोणता आहे? याची अद्याप खात्री झाली नाही़ म्हणून तांदळाचे नमुने तपासणी झाल्यावरच खरा प्रकार उघडकीस येईल़ मात्र तांदूळ उमरी तालुक्यातील नाही़ जप्त झालेला हा ट्रक धर्माबाद येथून भरलेला होता़ ट्रक चालकाने तसा जबाब दिला आहे - डॉ़ मृणाल जाधव, तहसीलदार, उमरी़