घटनेचे परिस्थितीसापेक्ष अर्थ लावणे आवश्यक
By admin | Published: July 25, 2014 12:47 AM2014-07-25T00:47:37+5:302014-07-25T00:47:37+5:30
घटनात्मक संस्थांचा आपण आदर करतो आणि घटनेचाही आदर करतो. पण घटना आणि कायदा माणसांसाठी तयार करण्यात आले आहेत. घटना परिस्थितीसापेक्ष प्रवाही असणे गरजेचे आहे.
गिरीश गांधी : रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष राम जाधव यांचा सत्कार
नागपूर : घटनात्मक संस्थांचा आपण आदर करतो आणि घटनेचाही आदर करतो. पण घटना आणि कायदा माणसांसाठी तयार करण्यात आले आहेत. घटना परिस्थितीसापेक्ष प्रवाही असणे गरजेचे आहे. घटनेच्या अतिरेकी पालनाने एखादी सकारात्मक कलाकृती समाजासमोर येण्यापासून वंचित राहात असेल आणि कलाक्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्या कलावंतांना नाउमेद करणार असेल तर घटनेचा योग्य आणि सकारात्मक अर्थ लावला पाहिजे, असे मत गिरीश गांधी यांनी व्यक्त केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्यावतीने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक राम जाधव यांचा सत्कार बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे गुरुवारी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. अनिल सोले, डॉ. वि.स. जोग, नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, डॉ. नरेश गडेकर, नाट्य परिषद मध्यवर्तीचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी अनिल सोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन राम जाधव यांचा सत्कार करण्यात आला. गिरीश गांधी म्हणाले, ‘गिधाडे’ आणि अनेक नाटके वादग्रस्त ठरलीत, पण रंगभूमीवर त्यांचे प्रयोग झाले. दाभोलकरांचा खून होऊन एक वर्ष झाल्यावरही त्यांच्या मारेकऱ्यांचा पत्ता लागत नाही. या घटनेवर आधारित नाटकालाही रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून सहा महिन्यानंतरही परवानगी मिळत नसेल आणि घटनेचा अडसर होत असेल तर महाराष्ट्राला पुरोगामी चळवळींकडे अधिक वेगाने कसे नेता येईल. घटनेचे अर्थ त्यासाठीच सकारात्मक लावले पाहिजे. घटनाही कालबाह्य होत असेल तर त्यात सुधारणा करण्याचा आग्रह मंडळाने शासनाकडे केला पाहिजे, असे ते म्हणाले. राम जाधव यांचे काम मोठे आहे. त्यांच्या मार्गदर्शनात अकोल्याला नाट्य परिषदेची शाखा निर्माण झाली. पहिल्याच दिवशी त्यांचे ८०० सदस्य होते. नागपूर कार्यकारिणीनेही यातून काही शिकले पाहिजे, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.
डॉ. जोग म्हणाले, मराठी नाट्यक्षितिजावर आल्हाददायक असणारा चंद्र म्हणजे राम जाधव आहेत. हा अक्षय चंद्र आहे. वाद झाले तरीही सामाजिक ऐक्य सांभाळताना काही बाबतीत मर्यादा टाकण्याचा अधिकार मंडळाला असलाच पाहिजे. कलावंतांचा अहंकार आणि समाजाची असंवेदनशीलता यातून मंडळाने मार्ग काढावा. साहित्य संस्कृती मंडळ आणि रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे कार्यालय नागपुरात असावे, असे आवाहन त्यांनी केले. अनिल सोले यांनी राम जाधव यांच्या कार्याला सलाम केला. प्रमोद भुसारी यांनी जाधव आपल्याला गुरुस्थानी असल्याचे सांगितले. प्रफुल्ल फरकसे यांनी प्रस्तावना तर संचालन प्रभा देऊस्कर यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना राम जाधव म्हणाले, नाट्यक्षेत्राचे शास्त्रशुद्ध शिक्षण गावागावांत दिले पाहिजे. समाजात कलावंत महत्त्वाचा असतो कारण जागतिक स्तरावर क्रांती करणारे विचारवंत आणि कलावंतच होते. पण कलावंतांकडेच दुर्लक्ष केले जाते.
मंडळाच्या माध्यमातून मी सातत्याने कार्य करीत राहील. याप्रसंगी उपस्थितांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेबांचे स्वगत म्हणून दाखविले आणि साऱ्यांनीच त्यांना दाद दिली. (प्रतिनिधी)