सध्यातरी कुठलेही निर्बंध लावण्याची तयारी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 06:59 PM2021-12-09T18:59:04+5:302021-12-09T19:00:21+5:30
Nagpur News ओमायक्राॅनच्या बाबतीत घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्यातला ओमायक्राॅनचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. पण काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचा दर आता कमी होत आला आहे.
नागपूर : तिसरी लाट येईल किंवा नाही येईल, पण आपण सतर्क राहायला हवे. हे हवामान खात्यासारखे नाही पण तिसरी लाट आली तर आपली तयारी आहे. सध्या तरी कुठलेही निर्बंध लावण्याची तयारी नाही, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, असे इतर मागासवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात सांगितले.
वडेट्टीवार म्हणाले, ओमायक्राॅनच्या बाबतीत घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्यातला ओमायक्राॅनचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. पण काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचा दर आता कमी होत आला आहे. ॲक्टिव्ह रुग्णही कमी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षण जाण्यास भाजप जबाबदार आहे. केंद्र सरकारने यासाठी घटनेत दुरुस्ती करावी व ओबीसींचे २७ टक्के आरक्षण लागू करावे. भाजपने ढोंगीपणा करून लोकांमध्ये संभ्रम तयार करू नये, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचा १४ डिसेंबरचा गडचिरोली दौरा राजकीय नाही. आदिवासी मुलींना सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी त्या येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रावत यांच्या अपघाताची माहिती देशाला कळावी- देशाचे संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचा झालेला अपघाती मृत्यू ही दुःखाची बाब आहे. या अपघाताबाबत संजय राऊत यांनी घेतलेली शंका अनेकांच्या मनात आहेत. संजय राऊत यांच्या मनातील शंकेचे निरसण व्हायला हवे. नेमका हा अपघात कसा घडला याची माहिती देशाला कळावी. सत्ताधाऱ्यांनी याची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.