शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 06:34 AM2021-01-11T06:34:04+5:302021-01-11T06:34:36+5:30

चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून आरोग्य संचालकांची उचलबांगडी

It is not a short circuit, but human error that has caused the death of ten infants in the treasury | शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी

शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयातील शनिवारी पहाटेच्या आगीमागे शॉर्टसर्किटचे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात मानवी चुकांमुळेच दहा तान्हुल्यांचा बळी गेल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. दोषीना वाचविण्याचे प्रयत्न चव्हाट्यावर आले असून त्याच कारणाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषित केलेल्या सहा सदस्यीय चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांना हटवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे ती जबाबदारी सोपविली.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी जिल्हा रूग्णालयाची पाहणी केली व दुर्घटनेत बळी पडलेल्या बाळांच्या मातापित्यांची भेट घेऊन सांत्वन केले. 

पोलीस कारवाईला चाैकशी समितीचा कोलदांडा
दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस कारवाईतून वाचविण्यासाठीच चौकशी समितीचा खेळ रचण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. एरव्ही, असे काही ध़डले की प्रथमदर्शनी दोषी असलेल्यांविरूद्ध पोलिस गुन्हे दाखल करतात. इथे घाईघाईन चौकशी समिती नेमल्याने पोलीस कारवाईस लगाम बसला. 

त्या घटनेला केवळ हलगर्जीच कारणीभूत

भंडारा दुर्घटनेतील हलगर्जीची एक-एक बाब आता समोर येऊ लागली आहे. आग प्रतिबंधक उपाययोजनेच्या 
१ कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रकमेच्या अंदाजपत्रकावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे आरोग्य संचालकांकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. तो धूळखात पडून राहिला. 

डॉ. साधना तायडे याच त्यासाठी जबाबदार असताना त्यांनाच चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले. या संदर्भातील एक पत्र ‘लोकमत’चा हाती लागले असून, त्यानुसार, भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. साधना तायडे व उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना १५ सप्टेंबर २०२० ला आग प्रतिबंधक उपाययोजनेचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु त्या प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. त्यासाठी ताे प्रस्ताव संचालकांनी रोखून धरला.

त्या परिचारिका कोण आहेत?
या कक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या परिचारिकांनी कक्षाला बाहेरून कडी लावल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, त्या परिचारिका कोण हे शोधण्याचे काम कालपासून सर्वजण करताहेत. परंतु, आरोग्य यंत्रणा त्यांचे नाव समोर येऊ देत नाही. त्यामागे काही गंभीर कारण असावे, असे बाेलले जाते. 

खासगी रुग्णालय असते तर..?
एखाद्या खासगी रुग्णालयात भंडारासारखी दुर्घटना घडली असती तर आत्तापर्यंत संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली असती. मग अठ्ठेचाळीस तास उलटून गेली तरी अद्याप कोणावर करवाई नाही, साधा गुन्हाही दाखल झालेला नाही. कोण, कुणाला वाचवित आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

आराेग्य संचालक 
डॉ. साधना तायडे यांची संशयास्पद नियुक्ती
n अग्नितांडवाच्या चाैकशीसाठी आराेग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी नेमलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरुन आराेग्य संचालक डॉ. साधना तायडे यांची अवघ्या २४ तासातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलबांगडी केली. 
n फायर ऑडिट प्रकरणातील डॉ. तायडे यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 
n नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार आता समितीचे अध्यक्ष असतील. डॉ. तायडे आता समितीच्या केवळ सदस्य असतील.

लाेकमतची भूमिका

सहली नकोत, कारवाईच हवी! 
भंडाऱ्यात दहा बाळांचा करुण अंत झाल्यापासून राजकीय नेते सांत्वनाच्या नावाखाली जिल्हा रूग्णालयाला भेटी देत आहेत. मात्र, ४८ तास उलटून गेल्यानंतरही कुणावरही कारवाई झालेली नाही. जनतेला या राजकीय सहलींचा उबग आला आहे. यापुढे हे चालणार नाही. दाैरे, खोटे सांत्वन, कोरडी आश्वासने आणि सहनुभूती नको, कारवाई हवी, हीच जनतेत तीव्र भावना आहे. जनतेच्या भावना हीच आमची भूमिका! तेव्हा, ‘लोकमत’नेदेखील स्पष्ट भूमिका घेतली असून राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांची छायाचित्रे, कौतुक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: It is not a short circuit, but human error that has caused the death of ten infants in the treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.