मासिक पाळतही लस घेता येते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:19+5:302021-05-08T04:09:19+5:30
नागपूर : १ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्या लोकांचे कोरोना लसीकरण सुरू झाले आहे, परंतु मागील काही दिवसांपासून मासिक पाळीत ...
नागपूर : १ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्या लोकांचे कोरोना लसीकरण सुरू झाले आहे, परंतु मागील काही दिवसांपासून मासिक पाळीत लस घेऊ नका, असे मॅसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने गोंधळ उडाला आहे. याबाबत तज्ज्ञांना विचारले असता, त्यांनी या काळातही लस घेता येते, याबाबत कुठलेही गैरसमज पाळू नका व पसरवू नका, असा सल्लाही दिला.
लसीकरणासाठी नोंदणी करताना मासिक पाळी कधी येते, त्याकडे लक्ष ठेवा. मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवसांनंतर लस घेऊ नका, कारण मासिकपाळीत दरम्यान आपली रोगप्रतिकार क्षमता कमी झालेली असते. लसीचा पहिला डोस आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी करते. या दरम्यान कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढतो. यामुळे मासिक पाळी काळात लस घेऊ नका, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे विशेषत: तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, परंतु मासिक पाळीचा रोगप्रतिकारशक्तीशी कोणताही संबंध येत नसल्याने मासिक पाळीच्या कोणत्याही दिवशी लस घेता येऊ शकते, असे स्त्रीरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
- मासिक पाळीत रोगप्रतिकारशक्ती कमी होत नाही
मासीक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. रोगप्रतिकारशक्तीशी याचा कुठलाही संबंध नाही. मासिक पाळीत रोगप्रतिकारशक्ती कमी किंवा वाढत नाही. यामुळे मासिक पाळीचा कुठल्याही दिवशी कोरोना प्रतिबंधक लस घेता येते. मासिक पाळी व कोरोनाशी संबंध लावणारे मॅसेज पसरवू नये.
- डॉ.चैतन्य शेंबेकर
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ
::पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या
आरोग्यसेवक - ४३,७६१
फ्रंट लाईन वर्कर-४८,२५३
१८ ते ४४ वयोगट-४,७४४
४५ वरील वयोगट-१५,४९७
४५ व कोमार्बिड-७६,५९६
६०वरील वयोगट-१,६२,३०५
:: ४,४१,१५६ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला
::१,१०,५४४ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला