योग्य व्यायाम, आहार व डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे खेळातील गुणवत्ता वाढविणे शक्य; डॉ. सतीश सोनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:04 PM2018-01-08T18:04:43+5:302018-01-08T18:05:14+5:30

खेळांमधून होणाऱ्या दुखापती पूर्णपणे टाळणे खेळाडूंना कधीच शक्य नसते. पण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखापत गंभीर होण्यास टाळता येते, अशी माहिती प्रसिद्ध अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोनार यांनी दिली.

It is possible to increase the quality of sports by proper exercise, diet and doctor's advice; Dr. Satish Sonar | योग्य व्यायाम, आहार व डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे खेळातील गुणवत्ता वाढविणे शक्य; डॉ. सतीश सोनार

योग्य व्यायाम, आहार व डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे खेळातील गुणवत्ता वाढविणे शक्य; डॉ. सतीश सोनार

googlenewsNext
ठळक मुद्देखेळांडूनी दुखापतीकडे दुर्लक्ष करू नये

आॅनलाईन लोकमत
नागपूर : अनेक क्रिकेट, बॅडमिंटन व टेनिसपटूंना खांद्याच्या तर फुटबॉल खेळाडूंना हमखास ‘अँकल’ दुखापतीला सामोरे जावे लागते. खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खेळांमधून होणाऱ्या दुखापती पूर्णपणे टाळणे खेळाडूंना कधीच शक्य नसते. पण, योग्य ती काळजी घेतल्यास, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखापत गंभीर होण्यास टाळता येते, अशी माहिती प्रसिद्ध अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोनार यांनी दिली.

शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच खेळ निवडा
हल्ली असे दिसून येते की कित्येक मुलांच्या पालकांना आपला मुलगा खेळाडू व्हावा असे वाटते आणि त्या दृष्टीने ते आपल्या मुलाला घडविण्याचा प्रयत्नही करतात. ही एक चांगली बाब असली तरी अनेक खेळाडूंना आवश्यक पायाभूत सोई मिळत नाही. यातच आपली क्षमता व शारीरिक ठेवण लक्षात न घेता कुठलाही खेळ खेळत असल्याने गुणवत्ता असूनही विविध दुखापती घेऊन बसतात. आपली शारीरिक क्षमता व गुणवत्ता लक्षात घेऊनच खेळ निवडावा, असा सल्ला डॉ. सोनार यांनी दिला.

खेळ खेळण्यापूर्वी २० मिनिटे व्यायाम आवश्यक
प्रत्येक खेळाडूने कुठलाही खेळ खेळण्यापूर्वी साधारण २० ते २५ मिनिटे व्यायाम करायला हवा. स्नायू ताणतील असा व्यायामाचा प्रकार असावा. यामुळे खेळताना दुखापतीचे प्रमाण कमी होईल. सोबतच खेळून झाल्यावर तेवढीच मिनिटे ‘कुल डाऊन’ व्हायला हवे. यात हलके स्नायूला ताण देण्याचा व्यायाम व थोडी विश्रांती घ्यायला हवी.

आहार महत्त्वाचा
डॉ. सोनार म्हणाले, खेळाडूंनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मसाले, तळलेले व गोड पदार्थ टाळावे किंवा कमी करावे. दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवायला हवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘नॉन व्हेज’चाही आहारात समावेश करावा. कारण, कुठल्याही खेळासाठी स्नायू मजबूत असणे आवश्यक आहे.

खेळाप्रमाणे ‘अप्पर’ व ‘लोवर बॉडी मसल्स’कडे लक्ष द्यावे
बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळाडूंची ‘अप्पर बॉडी मसल्स’ मजबूत असायला हवी. तर ‘लोवर बॉडी मसल्स’मध्ये चपळता असण्यासाठी त्या दृष्टीने स्नायू असायला हवे. या उलट फुटबॉल, हॉकीसारख्या खेळांमध्ये खेळाडूची ‘लोवर बॉडी मसल्स’ म्हणजे पायाचे स्नायू दणकट असायला हवे तर ‘अप्पर बॉडी मसल्स’मध्ये चपळता असायला हवी. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असेही डॉ. सोनार म्हणाले.

खेळाडूंनी ‘हॉट मसाज’ टाळावा
खेळाडूला दुखापत झाल्यास त्यावर ‘हॉट मसाज’ करू नये. कारण दुखपतीची जागा आधीच ‘हॉट’ असते त्यात ही ‘मसाज’ गंभीरता वाढविते. याऐवजी १५ ते २० मिनिटे ‘आईस मसाज’ करावा. नंतर वेदनाक्षमक स्प्रेचा वापर करून स्क्रॅप बॅण्डेज बांधावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा.

दुखापत गंभीर होऊ नये
कोणताही खेळ खेळताना खेळाडू सर्वस्व पणाला लावून खेळत असतो. अशावेळी त्याच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. खेळताना या खेळाडूंना दुखापती होणेही साहजिक असते. परंतु काही खेळाडू दुखापत सांगितल्यास खेळातून काढून टाकतील या भीतीने दुखापत लपवितात. परंतु असे करणे म्हणजे, स्वत:ची दुखापत वाढविण्यासारखेच असते. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखापत लवकर भरून निघते, शस्त्रक्रिया टाळता येते.

आॅर्थाेस्कोपी शस्त्रक्रिया खेळाडूंसाठी वरदान
पूर्वी कुठल्याही खेळाडूला मोठी दुखापत झाल्यास व त्यावर शस्त्रक्रिया झाल्यास पुढे तो खेळू शकेल किंवा नाही यावर संशय व्यक्त व्हायचा, परंतु आता ‘आॅर्थाेस्कोपी’ म्हणजे दुर्बिणद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे कमीत कमी चिरा लागून अचूक शस्त्रक्रिया होत असल्याने खेळाडू पुन्हा खेळण्याची शक्यता वाढते. ही शस्त्रक्रिया खेळाडूंसाठी वरदान ठरत आहे. शस्त्रक्रिया एवढेच महत्त्व फिजिओथेरपीचे आहे. यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या खेळाडूंनी फिजिओथेरपीला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.

अपघातानंतरचे दुखणे अंगावर काढू नका
डॉ. सोनार म्हणाले, सध्या दुचाकी चालकांच्या अपघातांची संख्या वाढली आहे. यात पाय मुरगळणे, खांद्याचा पडदा फाटणे ही समस्या दिसून येते. या दुखापतीमुळे सुरुवातीला सूज येते व नंतर ती बरीही होते. परंतु दोन-तीन महिन्यांनंतरही चालताना किंवा पायºया चढताना त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

रस्त्यावर, सिमेंटच्या फ्लोअरवर धावू नये
अनेक खेळाडू किंवा सामान्य व्यक्ती रस्त्यावर किंवा सिमेंटच्या फ्लोअरवर धावतात. परंतु असे केल्याने गुडघा व पाठीच्या स्नायूंना झटके बसतात. भविष्यात गुडघा किंवा पाठीचे दुखणे वाढण्याची शक्यता असते. म्हणून मैदानावर धावावे. ४०-४५ वर्षांवरील व्यक्तींनी धावण्यापेक्षा पायी चालणे योग्य आहे. धावण्यासाठी किंवा मॉर्निग वॉक करण्यासाठी धावण्याचेच शूज वापरावे व कॉटनचे कपडे वापरावे.

 

 

Web Title: It is possible to increase the quality of sports by proper exercise, diet and doctor's advice; Dr. Satish Sonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा