विद्रुप चेहऱ्यावरही हास्य फुलविणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:13 AM2020-12-05T04:13:42+5:302020-12-05T04:13:42+5:30
नागपूर : चेहरा हा संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. चेहऱ्याची सुंदरता ही नाक, गाल, डोळे, हनुवटी, दात, कान व कपाळ ...
नागपूर : चेहरा हा संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. चेहऱ्याची सुंदरता ही नाक, गाल, डोळे, हनुवटी, दात, कान व कपाळ यांची व्यवस्थित ठेवण यावर अवलंबून असते. मात्र, अनेकांच्या चेहऱ्यावरील या अवयवांची ठेवण व्यवस्थित नसते, किंवा एखाद्या अपघातामुळे चेहरा विद्रूप होतो. याचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर पडतो. जीवन प्रभावहीन वाटू लागते. सार्वजनिक जीवनात वावरताना कमीपणाचे वाटते. याला कंटाळून अनेकजण आत्महत्येस प्रवृत्तही होतात. परंतु आता अत्याधुनिक पद्धतीचा वापर करीत चेहरा सुंदर व आकर्षित करणे शक्य झाले आहे, असे मत मॅक्झिलो-फॅशिअल तज्ज्ञांनी व्यक्त केले.
इंडियन प्रोस्टोडाँटिक सोसायटी (आयपीएस) नागपूर शाखेच्या वतीने राज्यात प्रथमच नागपुरात आर्ट फ्युचरिस्टिक व्हर्च्युअल परिषदेचे आयोजन करण्यात आले. चार दिवसीय या परिषदेचे उद्घाटन आयपीएसचे अध्यक्ष डॉ. जे. आर. पटेल, सचिव डॉ. रूपेश पीएल, संपादक डॉ. गोपी चंदर व परिषदेचे सचिव महेंद्रनाथ रेड्डी यांच्या उपस्थितीत डॉ. डी सोयेमानावाता यांनी केले. यावेळी परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. उषा राडके व संघटनेचे सचिव डॉ. साई देशमुख उपस्थित होते.
या परिषदेत प्रोस्टोडाँटिस्ट्स (आयसीपी), इंटरनॅशनल सोसायटी फॉर मॅक्झिलो-फॅशिअल रिहॅबिलिटेशन (आयएसएमआर), एशियन अकॅडमी ऑफ प्रोस्थोडॉन्टिक्स (एएपी), जपानी प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी (जेपीएस), नेपाळ प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी आदी संस्था सहभागी झाल्या आहेत. परिषदेत २८०० तज्ज्ञ सहभागी असून ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पीकर्स मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेत, आज थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रियेतील अचूकता, दंत प्रत्यारोपण समर्थीत कृत्रिम अवयव, मॅक्झिलो-फॅशिअल कृत्रिम अवयव तसेच डिजिटल डेन्चरवर मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेच्या आयोजनासाठी परिषदेचे सहअध्यक्ष डॉ. नीलम पांडे, कोषाध्यक्ष डॉ. सत्यम वानखेडे, आयपीएस नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सुंदरकर, डॉ. तुषार मवाडे, डॉ. अंजली बोर्ले, डॉ. बी.के. मोटवानी, डॉ. अरुण खळीकर, डॉ. जय गाडे , डॉ. दीप्ती लंबाडे, डॉ. अनुज चांडक, डॉ. जया जोशी, डॉ. नेहा गर्ग, डॉ. सुलेखा गोसावी, डॉ. प्रीती जयस्वाल, डॉ. विनय कोठारी, डॉ राहुल टेकाडे, डॉ. गणेश बजाज, डॉ. योगेश इंगोले, डॉ. पराग भोयर, डॉ. वैभव कांबळे, डॉ. जयश्री चहांदे व डॉ. अनिता कहार परिश्रम घेत आहेत.