पाऊस पडला ९९ टक्के, शिवार मात्र कोरडेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:20 AM2021-07-19T11:20:15+5:302021-07-19T11:25:24+5:30

Nagpur News पर्जन्यमानाच्या अहवालामध्ये १८ जुलैपर्यंत सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात शिवार मात्र कोरडेच आहे. आठवडाभरापासून विदर्भात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

It rained 99 percent, but land was dry! | पाऊस पडला ९९ टक्के, शिवार मात्र कोरडेच !

पाऊस पडला ९९ टक्के, शिवार मात्र कोरडेच !

Next
ठळक मुद्देआठवडाभरापासून पावसाची दांडी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यंदा हवामान विभागाने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. पर्जन्यमानाच्या अहवालामध्ये १८ जुलैपर्यंत सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात शिवार मात्र कोरडेच आहे. आठवडाभरापासून विदर्भात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पर्जन्यमानाच्या वार्षिक नोंदीनुसार, नागपूर जिल्ह्यात १ जून ते ३१ मे पर्यंतचा वार्षिक पाऊस १४,८०६ मिमी (सरासरी १०५७.६० मिमी) असतो. विदर्भातील पाऊस साधारणत: ऑक्टोबरपर्यंत पडतो. नोंदीनुसार, १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंतचा वार्षिक पाऊस १३,६७४.७३ मिमी (सरासरी ९७६.७७ मिमी) असतो. मागील वर्षी १८ जुलैपर्यंत ४,८७८.९४ मिमी (सरासरी ४४८.५०) पाऊस पडला. यंदा १७ जुलैपर्यंत ४,८५४.७४ मिमी (सरासरी ३४६.१२) पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या हिशेबाने ही टक्केवारी ९९.३२ आहे. टक्केवारीमध्ये पाऊस चांगला दिसत असला तरी प्रत्यक्षात पिकांसाठी पुरेसा नाही. नागपूर जिल्ह्याचा विचार करता पावसाचा असमतोल दिसत आहे. कोणत्या तालुक्यात १०० टक्क्यांवर पाऊस, तर कुठे ९० टक्क्यांपेक्षाही कमी अशी स्थिती आहे. नरखेड, कळमेश्वर, उमरेड, काटोल, नागपूर ग्रामीण या तालुक्यांमध्ये पावसाची टक्केवारी कमी आहे. यामुळे स्थानिक पीक परिस्थितीवर याचा परिणाम जाणवत आहे.

१८ जूनपर्यंतचा जिल्ह्यातील सरासरी पाऊस

नागपूर शहर : ११३.६३ मिमी

नागपूर ग्रामीण : ८६.२५ मिमी

कामठी : ११०.८५ मिमी

हिंगणा : १०३.८२ मिमी

काटोल : ७७.५२ मिमी

नरखेड : ७८.५७ मिमी

सावनेर : १२३.४५ मिमी

कळमेश्वर : ६४.१७ मिमी

रामटेक : ९९.२७ मिमी

पारशिवणी : ११४.२५ मिमी

मौदा : ९१.८३ मिमी

उमरेड : ८७.६६ मिमी

भिवापूर : १२४.४२ मिमी

कुही : १०८.६१ मिमी

 

विदर्भात पावसाचा इशारा

वेधशाळेच्या अनुमानानुसार, पुढील ४८ तासांत नागपूरसह वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघजर्गनेसह आणि विजांच्या कडकडाटासह एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतच्या पुढील ४८ तासांमध्ये म्हणजे २१ आणि २२ जुलैला गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया, भंडारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

धानाच्या रोवण्या खोळंबल्या

नागपूरसह पूर्व विदर्भातील सर्वच धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये धानाच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार फक्त ३० ते ३३ टक्के कृषी क्षेत्रावर आतापर्यंत धानाची लागवड झाली आहे. पुरेशा पावसाअभावी चिखल होऊ शकत नसल्याने राेवण्या लांबणीवर पडल्या आहेत. टाकलेले पऱ्हे जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दमट हवामानामुळे सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

...

Web Title: It rained 99 percent, but land was dry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस