नागपुरात पाऊस आला, थंडी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:10 PM2020-02-07T23:10:30+5:302020-02-07T23:12:27+5:30
शहरातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने शुक्रवारी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने खाली घरसले. त्यामुळे दिवसभर थंड हवा पसरली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने शुक्रवारी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने खाली घरसले. त्यामुळे दिवसभर थंड हवा पसरली होती. शुक्रवारी पहाटे आणि सायंकाळी चांगला पाऊस झाला. त्यामुळे थंडी वाढली. हवामान विभागानुसार मराठवाड्यात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्कुलेशन आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे विदर्भातील काही भागात पाऊस पडत आहे. पुढील एक-दोन दिवस आकाशात ढग दाटून येतील. हलका पाऊसही पडेल. शुक्रवारी पहाटे पाऊस झाला. दिवसभर अधूनमधून पाऊस येत-जात होता. सायंकाळी ६.३० वाजता पुन्हा वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस पडला. जवळपास अर्धा तास पाऊस होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते.
नागपुरात ५.९ मिमी पाऊस
नागपुरात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ५.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारीसुद्धा चांगला पाऊस झाला. विदर्भात यवतमाळमध्ये सकाळी ८.३० वाजेपर्यंत सर्वाधिक १० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय ब्रह्मपुरीमध्ये ४.२ मि.मी., चंद्रपूरमध्ये ३ मि.मी., गडचिरोली ३.६ मि.मी., गोंदिया २ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.