कामठीत पुन्हा तेच की यावेळी नवे पर्व?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:58+5:302021-09-07T04:11:58+5:30

सुदाम राखडे कामठी : डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ कालावधी संपणाऱ्या नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले ...

Is it the same again in Kamathi or a new festival this time? | कामठीत पुन्हा तेच की यावेळी नवे पर्व?

कामठीत पुन्हा तेच की यावेळी नवे पर्व?

Next

सुदाम राखडे

कामठी : डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ कालावधी संपणाऱ्या नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार कामठी नगर परिषद प्रशासनाने वाॅर्ड रचनेला सुरुवात केली आहे. वॉर्डाचे सीमांकन व रचना योग्य व्हावी याकरिता राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आहेत.

आगामी निवडणुकीत कामठीत काँग्रेसला पुन्हा संधी मिळेल की अंतर्गत गटबाजीचा फटका बसेल, या चर्चा शहरातील राजकीय कट्ट्यावर रंगू लागल्या आहेत.

गत १० वर्षांपासून कामठी न.प.चे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे आहे, तर २० वर्षांपासून आमदार भाजपाचा आहे. ३१ नगरसेवक असलेल्या कामठी नगर परिषदेत २०१७ मध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मोहम्मद शहाजहां शफात अन्सारी यांना १४,५०० तर भाजप-रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम १२ हजार मते मिळाली होती. यासोबतच भाजप बंडखोर रणजित सफेलकर यांनी ७,५०० तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रमोद (दादा) कामळे यांना ४,५०० मते मिळाली होती. तीत काँग्रेसच्या अन्सारी यांनी बाजी मारली. त्यावेळी काँग्रेसचे १५, भाजप - ०८, बहुजन रिपब्लिकन एकता मंच - २, शिवसेना, बसपा, एमआयएमचा प्रत्येकी एक व तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

काँग्रेसकडे एकहाती सत्ता असल्यामुळे अपक्ष, एमआयएम व बसपा नगरसेवकांनी सत्तापक्षासोबत मिळून कार्य केले. त्यामुळे सत्तापक्षाचे पाठबळ वाढल्याने निर्णय प्रक्रियेत अडचणी आल्या नाही. गत पाच वर्षांच्या काळात विरोधी पक्षाचे नगरेसवक विकास कामाच्या मुद्यावरही फारसे आक्रमक दिसून आले नाही. मात्र वॉर्डातील विकास कामाचे कंत्राट नगरसेवक व त्यांच्याशी संबंधित लोकांना मिळाल्याने कामाचा दर्जा मात्र खालावला. येणारी पालिका निवडणूक वॉर्ड पद्धतीमुळे होणार असल्याने कामठीतील सर्वच राजकीय पक्षात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपक्ष नगरसेवकाची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे नगरसेवक निवडणुकीनंतर जाहीर होईल. तीत सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत अपक्षांना विशेष महत्त्व येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

२०१२ मध्ये काँग्रेसच्या रुबीना शेख नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. त्यादरम्यान दोन अपक्ष नगरसेवकांना अच्छे दिन आले होते, हे विशेष.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी सरकारमधील सर्वच घटक पक्षांनी न.प.साठी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, समाजवादी पार्टी आणि नुकतीच नव्याने उदयास आलेल्या कामठी नगर विकास आघाडीनेही कामठी न.प.साठी दंड थोपटले आहेत.

८६ हजार मतदारावर मदार

१ जानेवारी २०२१ च्या मतदान नोंदणीनुसार कामठी शहरात ८६ हजार ७३६ मतदार आहेत. यात ४२ हजार ७३९ पुरुष तर ४३ हजार ९९७ महिला मतदार आहेत. हेच मतदार आगामी नगर परिषद निवडणुकीत ३१ नगरसेवकांची निवड करणार आहेत.

Web Title: Is it the same again in Kamathi or a new festival this time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.