पालघर हत्याकांडात जातीय राजकारण होणे दुर्दैवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:08 AM2020-04-22T11:08:27+5:302020-04-22T11:09:01+5:30
पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेल्या १०१ आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही. काही लोक जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. बुधवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही भावना व्यक्त केली.
पालघर येथे हत्याकांड झाल्यानंतर ८ तासात पोलिसांनी १०१ आरोपींना ताब्यात घेतले. हा आदिवासी बहुल भाग आहे. मुलं पळविणारी टोळी आल्याच्या अफवेतून हा प्रकार घडला. या घटनेचा तपास स्पेशल आयजी व सीआयडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या हत्याकांडाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ही वेळ सवार्नी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. पण काही लोक मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.
वाधवान कुटुंबियांना सीबीआयकडे देणार
गृहमंत्र्यांनी वाधवान कुटुंबियांबाबत शासनाची भूमिका मांडली. वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जायची परवानगी देणे ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मोठी चूक होती. आज त्या कुटुंबियांचा अलगिकरणाचा कालावधी संपतो आहे. त्यामुळे ईडी आणि सीबीआयला तसे आम्ही पत्र लिहून कळविले आहे व ताब्यात घेण्याची विनंती केली आहे, असेदेखील गृहमंत्र्यांनी सांगितले. मागील कालावधीत काही लोक लंडन किंवा इतर देशात पळून गेले. आम्ही मात्र जोपर्यंत सीबीआय येत नाही, तोपर्यंत वाधवान कुटुंबाला आमच्या ताब्यात ठेऊ, असा टोलादेखील त्यांनी लगावला.