देवेंद्र फडणवीस यांनीच ओबीसी समाजाला न्याय दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 04:13 PM2019-12-13T16:13:56+5:302019-12-13T16:16:14+5:30
शुक्रवारी बावनकुळे यांनी आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांची बाजू लावून धरली व भाजपातील सर्व ओबीसी नेते फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद पक्षातीलच ओबीसी नेत्यांमध्ये उमटत असून त्यांच्या वक्तव्याबद्दल पक्षात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
फडणवीस यांनी केवळ ओबीसी नेतेच नव्हे तर ओबीसी समाजाला देखील न्याय दिला, हे साऱ्यांनाच ठाऊक असताना खडसे आणि पंकजाताई यांनी असे विधान करणे दुर्देवी असल्याचे मत विदर्भातील ओबीसी नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी बावनकुळे यांनी आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांची बाजू लावून धरली व भाजपातील सर्व ओबीसी नेते फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. व्यक्ती जातीने नव्हे तर कर्तृत्वाने मोठी होते असेदेखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.
खडसे आणि पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनातील दु:ख मांडले.परंतु हे करीत असताना त्यांनी सरसकट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आरोपींच्या पिंजºयात उभे केले. यावेळी निवडून आलेल्या भाजप आमदारांमध्ये सर्वाधिक ओबीसी समाजाचे आहेत. मागील पाच वर्षांत ओबीसी समाजाच्या नेत्यांनाच मंत्रिमंडळात महत्वाची खाती मिळालीत. पक्षाच्या कोअर कमिटीत या समाजाला प्राधान्य दिले आहे.
मी मागील २२ वर्षांपासून फडणवीस यांच्या संपर्कात आहे. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर विधानसभेत फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचाच प्रश्न मांडला होता आणि तो त्यांनी मार्गी देखील लावून दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात ओबीसी समाजासाठी महामंडळ स्थापन करणारे फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, हे त्यांचे योगदान ओबीसी समाज कधीच नाकारणार नाही असे सांगत राज्यात सत्ता आली नसल्याच्या नाराजीतून ओबीसीचा मुद्दा समोर येत असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.