नातेवाइकांना सोडायला जाणे झाले कठीण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:55+5:302021-09-19T04:07:55+5:30
नागपूर : घरी आलेल्या नातेवाइकांना निरोप देण्यासाठी अनेक जण रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांना रेल्वेगाडीत बसवून देतात, परंतु गेल्या वर्षभरापासून ...
नागपूर : घरी आलेल्या नातेवाइकांना निरोप देण्यासाठी अनेक जण रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांना रेल्वेगाडीत बसवून देतात, परंतु गेल्या वर्षभरापासून पाहुण्यांना निरोप देणे ही कठीण बाब होऊन बसली आहे. एका कुटुंबातील चार जण जरी नातेवाइकांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले, तरी त्यांना प्लॅटफॉर्म तिकिटापोटी २०० रुपये मोजावे लागत आहेत. होय, रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढविल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपये करण्याची मागणी जोर धरत आहे.
- सहा महिन्यांपासून ५० रुपयांचा भुर्दंड
कोरोनामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्यात आले आहेत. १० रुपयांवरून प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये झाले आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचा भुर्दंड नागरिकांना बसत आहे. प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपये झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
- रोज १,३०० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री
नागपूर रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यांना निरोप देण्यासाठी हजारावर नागपूरकर रेल्वे स्थानकावर येऊन प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करतात. सध्या दिवसाकाठी १,३०० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होत आहे. या विक्रीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला एका दिवशी ६५ हजार रुपयांचा महसूल मिळत आहे.
-सध्या सुरू असलेल्या रेल्वे
-०२१९० नागपूर-मुंबई दुरांतो स्पेशल
-०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ स्पेशल
-०२०३६ नागपूर-पुणे विशेष स्पेशल
-०२१७० नागपूर-मुंबई सेवाग्राम स्पेशल
-०२२२४ अजनी-पुणे स्पेशल
-०२१५९ नागपूर-जबलपूर स्पेशल
-०११३७ नागपूर-अहमदाबाद स्पेशल
०१४०३ नागपूर-कोल्हापूर स्पेशल
-०२०४२ नागपूर-पुणे स्पेशल
-०२०२५ नागपूर-अमृतसर स्पेशल
-०२११४ नागपूर-पुणे गरीबरथ स्पेशल
-०९२१४ नागपूर-इंदूर स्पेशल
..........
सद्याच तिकीट कमी करण्याचा विचार नाही
‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले. सध्याच प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी करण्याचा विचार नाही.’
- एस.जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.
............