स्टेअरिंंगवर बसून दारू पिणे ‘त्यांना’ पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:07 AM2020-05-22T09:07:58+5:302020-05-22T09:08:35+5:30
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना खवासा बॉर्डरवर सोडून परत येत असताना स्टेअरिंगवर बसून दारू पिताना एका बसचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ एसटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. गुरुवारी या चालक, वाहकांची चौकशी होऊन त्याच्याविरुद्ध या गंभीर गुन्ह्याबाबत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना खवासा बॉर्डरवर सोडून परत येत असताना स्टेअरिंगवर बसून दारू पिताना एका बसचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ एसटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. गुरुवारी या चालक, वाहकांची चौकशी होऊन त्याच्याविरुद्ध या गंभीर गुन्ह्याबाबत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी विविध मार्गावर एसटी बसेस चालविण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातर्फे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरपर्यंत बसेस सोडण्यात येत आहेत. त्यानुसार १६ मे रोजी मजुरांना घेऊन विशाल मेंढे नावाचा चालक एम. एच. ४०, ५५८१ क्रमांकाची बस घेऊन खवासा बॉर्डरवर गेला. तेथे मजुरांना सोडून ही बस परत येत होती. दरम्यान, या चालकाने ‘स्टेअरिंग’वर बसून बीअर पीत असताना आपलाच व्हिडिओ काढला. त्याच्यासोबत पराग शेंडे नावाचा वाहकही बीअर पिताना व्हिडिओत दिसत आहे. गमतीत हा व्हिडिओ त्यांनीच व्हायरल केला. लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री बंद आहे. तरीही त्यांनी मद्य मिळविले आणि चालू बसमध्ये मद्य प्राशन केले. बस चालविताना बीअर पिल्याचा व्हिडिओ मिळाला असून त्यानुसार विभाग नियंत्रक कार्यालयाला अहवाल पाठविण्यात आला. विभाग नियंत्रक कार्यालयाने याची गंभीर नोंद घेऊन दोषी चालकास निलंबित केल्याची माहिती गणेशपेठचे आगारप्रमुख अनिल आमनेरकर यांनी दिली.
बस चालविताना मद्य घेणे गंभीर गुन्हा
‘खवासा बॉर्डरवर मजुरांना सोडून परत येताना एसटीच्या गणेशपेठ आगाराचा चालक विशाल मेंढे आणि वाहक पराग शेंडे यांनी मद्य प्राशन केले. स्टेअरिंगवर बसून बस चालविताना बीअर पीत असलेला व्हिडिओ बुधवारी मिळाला. त्यानुसार गणेशपेठ आगारप्रमुखांकडून याबाबत अहवाल मागविण्यात आला. गुरुवारी संबंधित चालक, वाहकाला निलंबित करण्यात आले. बस चालविताना मद्य प्राशन करणे हा गंभीर गुन्हा असून दोषी चालक, वाहकाविरुद्ध विभागीय दक्षता अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग