कर्मठ लोकांनीच नागपूरचा गौरव वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:11 AM2020-12-30T04:11:10+5:302020-12-30T04:11:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक जीवनातील तटस्थवृत्ती आणि विचारांवरील कर्मठ लोकांमुळेच नागपूरचा गौरव देशात वाढला असल्याची भावना माजी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक जीवनातील तटस्थवृत्ती आणि विचारांवरील कर्मठ लोकांमुळेच नागपूरचा गौरव देशात वाढला असल्याची भावना माजी खा. गेव्ह आवारी यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्रातर्फे सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये ज्येष्ठ संपादक व हिंदुत्वाचे भाष्यकार बाबूराव उपाख्य मा.गो. वैद्य आणि विंग कमांडर अशोक मोटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी आवारी आपल्या भावना व्यक्त करीत होते.
संघाचे सर्वच मोठे नेते महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि आजही त्यांच्या विचारांचे अनुसरण करतात. हिंदुस्तानात राहतो म्हणून आपण सर्व हिंदू आहोत, हे खरेच आहे. मात्र, भारतीयत्वाचा विचार करणे अपेक्षित आहे. मा.गो. हे त्याच धाटणीतील होते, असे आवारी यावेळी म्हणाले. अशोक मोटे हेही प्रखरवृत्तीचे होते. मा.गो. जसे विचारांनी उड्डाण भरायचे तसेच मोटे सैनिकी स्पिरिटने उड्डाण भरायचे, असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी होते. यावेळी ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी, मेघनाद बोधनकर, श्रीपाद अपराजित, देवेंद्र गावंडे, प्रदीप मैत्र यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत दोघांनाही आदरांजली वाहिली. संचालन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले.
..........