मेहनत सफल झाली; क्लास लावणे शक्य नव्हते, ‘सेल्फ स्टडी’नेच मिळाले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 08:35 PM2022-06-02T20:35:27+5:302022-06-02T20:38:13+5:30
Nagpur News क्लास लावण्याचीही क्षमता नसलेल्या सागर यांनी ‘सेल्फ स्टडी’च्या भरवशावर संघ लाेकसेवा आयाेग (यूपीएससी) च्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
नागपूर : अभावग्रस्त परिस्थिती कधीही तुम्हाला यश मिळविण्यापासून राेखू शकत नाही, गरज आहे केवळ जिद्द, आत्मविश्वास व परिश्रम घेण्याच्या तयारीची. सावनेरजवळ तेलकामठी या छाेट्याशा खेड्यातील शेतकरीपुत्र सागर यशवंत भाेपे यांनी हे दाखवून दिले. क्लास लावण्याचीही क्षमता नसलेल्या सागर यांनी ‘सेल्फ स्टडी’च्या भरवशावर संघ लाेकसेवा आयाेग (यूपीएससी) च्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
सागरचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावनेर येथूनच झाले. वडील अल्पभूधारक शेतकरी असून मागील तीन-चार वर्षांपासून नागपुरात एका काेचिंग क्लासेसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. दाेन वेळचे जेवण मिळते, अशीच बेताची परिस्थिती. सागरचा लहान भाऊ एका कंपनीत कामाला आहे व कुटुंबात त्याचाही हातभार लागताे. एवढेच नाही तर सागर यांच्या वाटचालीत लहान भावाच्या मदतीचेही माेठे याेगदान आहे. बारावीनंतर सागर यांनी वर्धा येथे रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी प्राप्त केली आहे. यादरम्यानच त्यांची वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी टावरी यांच्याशी भेट झाली. त्यांची प्रेरणा व मार्गदर्शन घेत काही मित्रांसमवेत त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.
पदवी पूर्ण केल्यानंतर पुढच्या तयारीसाठी माेठ्या शहरात जाणे शक्य नव्हते. नागपुरात क्लास लावण्याची इच्छा हाेती. पण, त्यांचे शुल्क आवाक्याबाहेर हाेते. त्यामुळे सागर यांनी स्वत:च अभ्यास सुरू केला. २०१९ साली पहिल्या प्रयत्नात मेन्स राहिली. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली. त्यांना रँक मिळाले नाही. पण, कम्पेन्सेटरी सर्व्हिस अंतर्गत ‘रेव्हेन्यू फाॅरेस्ट ऑडिटर ॲन्ड अकाउंटंट’ या पदावर नियुक्ती मिळाली आहे.
नाेकरी स्वीकारून पुन्हा तयारी
सागर सांगतात, वडील आणि लहान भावाच्या परिश्रमाला थाेडे फळ मिळाले आहे. परिस्थितीमुळे ही नाेकरी स्वीकारणार आहे. तत्पूर्वी ते महाराष्ट्र ॲग्री सर्व्हिस आणि महाराष्ट्र फाॅरेस्ट सर्व्हिसच्या ऑक्टाेबरमध्ये हाेणाऱ्या मेन्स परीक्षेची तयारी ते करीत आहेत. कृषी विभागात सहसंचालक पदावर निवड हाेईल, अशी आशा त्यांना आहे. अन्यथा पुन्हा यूपीएससीची तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील मुलांमध्ये माेठ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी काेचिंग आणि भरपूर पैसा लागताे, असे वाटते. हा गैरसमज आहे. अनेक आयएएस, आयपीएस गरीब परिस्थितीतून आले आहेत. आधी दहावी, बारावीत अपयश मिळालेल्या अनेकांनी प्रशासकीय सेवेत यश मिळविले आहे. त्यामुळे जिद्द व परिश्रम घेण्याच्या तयारीसाेबत याेग्य मार्गदर्शन मिळाले तर यश खेचून आणता येते.
- सागर भाेपे