यांच्यावर ‘काका मला वाचवा’ म्हणण्याची वेळ आली; श्रीकांत शिंदे यांनी सोडले अजित पवारांवर बाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2023 08:38 PM2023-05-09T20:38:16+5:302023-05-09T20:39:06+5:30
Nagpur News आता ‘काका मला वाचवा’ असे म्हणण्याची वेळ यांच्यावर आली आहे आणि हे आम्हाला शिकवणार, अशी बोचरी टीका करीत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर बाण सोडले.
नागपूर : स्वत:ची ओळख ज्यांनी काकांच्या नावाने प्रस्थापीत केली त्यांनी शिंदेंना कोण ओळखतं, असे बोलू नये. पाच सहा दिवसांपूर्वी त्यांना वाटले की आता मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. तसेच वागत होते. पण परत काकांनी पहाटेची पुनरावृत्ती केली. आता ‘काका मला वाचवा’ असे म्हणण्याची वेळ यांच्यावर आली आहे आणि हे आम्हाला शिकवणार, अशी बोचरी टीका करीत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर बाण सोडले.
शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा मंगळवारी नागपुरात पार पडला. यावेळी खा. श्रीकांत शिंदे, खा. कृपाल तुमाने, आ. आशीष जयस्वाल, आ. नरेंद्र भोंडेकर, पूर्व विदर्भ प्रमुख किरण पांडव, पक्षाचे सचिव भाऊ चौधरी, संदीप इटकेलवार, मंगेश काशिकर आदी उपस्थित होते.
यावेळी खा. शिंदे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. शिंदे म्हणाले, बॅनर लावल्याने कुणी भावी मुख्यमंत्री होत नाही. यांनी पहाटेचा प्रयत्न केला पण जमले नाही. यांना ते जमले नाही ते मुख्यमंत्री शिंदे यांनी करून दाखवलं. याचं शल्य त्यांना आहे. दुसऱ्यांदा प्रयत्न केला पण पुन्हा काकांनी हवा काढून घेतली. आज तुम्ही दुसऱ्या राज्यात जावून पहा, तुम्हाला किती लोक ओळखतात, असा सवाल करीत ‘सारा शहर अब मुझे काका के नाम से जानता है’ असा डायलॉग मारत त्यांनी अजित पवारांना डिवचले.
अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात !
- गेली अडीच वर्षे वर्षा बंगल्याची दारे बंद होती. राज्यातील मुखियाला भेटण्यासाठी सर्वसामान्यांना कवायद करावी लागायची. आज वर्षाची दारे २४ तास खुली आहेत. यांनी तर अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विश्वविक्रम केला आहे, अशा शब्दात खा. शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेम साधला. कोरोनाच्या काळात हे स्वत: घरी बसत होते व लॉकडऊना लावून जनतेलाही घरी बसवत होते. फेसबूक लाईव्हमध्ये मात्र यांनी पहिला नंबर मारला, असा टोलाही त्यांनी लगावला. महाविकास आघाडीतील लोक वज्रमुठ दाखविण्यासाठी सभा घेत आहेत. मात्र हे सत्तेच्या उद्देशाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आता सत्ता नसल्याने एकमेकांना चावायला लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
विदर्भावर लक्ष देणार
- यापूर्वी शिवसेनेकडून विदर्भावर लक्ष दिले जात नव्हते. जेथे आमचा फायदा नाही तेथे लक्ष देणार नाही, असे धोरण होते. पण आम्ही विदर्भातील प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रश्न सोडवू. अडचणित साथ देऊ. संघटन बांधणी व विस्तार करू, असेही खा. शिंदे यांनी स्पष्ट केले.