हप्ता भरायला उशीर झाला; घरी येतोय बँक वसुलीवाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:19+5:302021-08-01T04:09:19+5:30
नागपूर : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार हिरावल्या गेले असून, यातील बहुतांश जणांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. ...
नागपूर : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार हिरावल्या गेले असून, यातील बहुतांश जणांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. घरखर्चासह मुलांच्या शैक्षणिक खर्चाची चिंता सर्वांना सतावत आहे. अनेकांना उसनवारी करून घरखर्च चालवावा लागत आहे. दुसरीकडे बँकांनी कर्जवसुलीचा तगादा सुरू केला आहे. हप्ता भरायला उशीर झाल्याने बँकांचे वसुली प्रतिनिधी घरी येऊन धमकावत आहेत. प्रत्येक बँकांनी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.
बँकांनी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घराचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. वैयक्तिक कर्जासह व्यावसायिक, उद्योजक अशा कर्जदारांना नोटिसा बजावल्या जात आहेत. काहींच्या घरी पोस्टाने पोच दिली जात आहे. थकीत कर्जामध्ये सर्वाधिक गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या मोरोटोरियमच्या घोषणेनंतर अनेकांदा फायदा झाला होता; पण आता मुदत संपल्याने बँकांनी वसुली कडक करण्यास सुरुवात केली आहे. अनियमित कर्जदारांच्या घरी वसुलीसाठी माणसे पाठविणे सुरू केले आहे. थकलेले कर्ज एकरकमी भरण्यास तयार असलेल्या कर्जदारांना व्याजात सवलत देऊ केली आहे.
अनलॉकच्या काळात दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्सवर वेळेचे निर्बंध असल्याने व्यवसायावर संकट आले आहे. एकीकडे दुकान व कर्मचाऱ्यांचा खर्च तर दुसरीकडे बँकांचे ईएमआय भरल्याची चिंता व्यावसायिकांना सतावत आहे. कर्जाची मूळ रक्कम आणि त्यावर दररोज वाढणाऱ्या व्याजामुळे व्यावसायिकांसोबत सामान्यही त्रस्त आहेत. यातून तोडगा काढण्याची त्यांची मागणी आहे.
दुकान बंद पडले, कर्ज कसे भरणार :
कोरोनाचे संकट गेल्यावर्षीपासून आहे. त्यातच स्टेशनरीचे दुकान बंद पडल्याने बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, याचे संकट आहे. उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने घरखर्च चालविण्याची चिंता आहे. जवळील पैसेही संपले आहेत. बँकेचे कर्ज वसुलीसाठी फोन येत आहे.
सतीश जैन, व्यावसायिक.
गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद होता. त्यानंतर पुन्हा सुरू झाला. दिवाळी सणांत व्यवसाय केला. सध्या वेळेच्या निर्बंधामुळे व्यवसाय मंदीत आल्याने दुकान बंद केले. जवळील पैशांनी घरखर्च सुरू आहे. पुढे दुकान सुरू करून कर्ज फेडण्याची तयारी आहे.
राहुल हजारे, व्यावसायिक.
बहुतांश जणांचे कर्ज थकले; गृहकर्जाचे प्रमाण जास्त
कोरोना लॉकडाऊनच्या काळात वैयक्तिक, वाहन, गृहकर्जासह सर्वच कर्जे थकली आहेत. यामध्ये गृहकर्जाचे प्रमाण जास्त आहे. रिझर्व्ह बँकेच्या मोरोटोरियममुळे सहा महिने कर्ज भरण्यास स्थगिती मिळाली; पण आता बँकांकडून कर्ज भरण्यासाठी फोन येत आहेत. बँकांतर्फे चक्रवाढ व्याज आकारले जाते. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे. गृहकर्ज १० ते २० वर्षे कालावधीचे असतात. त्याचा हप्ताही जास्त असतो. नोकरी वा रोजगार गेल्यामुळे अनेकांना गृहकर्ज भरणे कठीण झाले आहे. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने कर्जदार चिंतित आहेत.
नोकरी गेली, गृहकर्ज थकले !
यावर्षी चार महिने नोकरी नसल्यामुळे गृहकर्जाचे हप्ते थकले आहेत. जून महिन्यात पुन्हा नोकरीवर रूजू झालो; पण पगारात कपात झाली आहे. चार महिन्यांच्या काळात घरखर्च बँकेतील जमा पैशांनी केला. त्यामुळे सध्या गृहकर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. घरखर्च चालवायचा की बँकांचे हप्ते भरायचे, याची चिंता आहे.
संतोष देवघरे.
वेळेच्या निर्बंधामुळे व्यवसाय होत नसल्याने मंदीत आहे. उत्पन्न कमी झाल्याने गृहकर्ज कसे फेडायचे, याची चिंता आहे. कर्जावर व्याज वाढत आहे, शिवाय मोरोटोरियमनंतर पुढील हप्ते भरण्याचे टेंशन आहे. वेळेचे निर्बंध हटल्यानंतर व्यवसाय पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच बँकांचे हप्ते भरण्याची सोय होईल.
मंगेश बडवाईक.
५२७ जणांना नोटिसा
राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी कर्ज थकीत असलेल्या जवळपास ५२७ कर्जदारांना नोटिसा दिल्याची माहिती आहे. हा आकडा पुढे वाढणार आहे. कोरोना काळात अनेकांचे कर्ज एनपीएमध्ये गेले आहे. मोरोटोरियमच्या सुविधेनंतरही अनेकांनी कर्जाचे हप्ते दिले नाहीत. अनेक जण कर्ज फेडण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती करीत आहेत.
थकीत कर्जाबाबत अधिकारी म्हणतात ...
कोरोनापूर्वी अनेकांचे खाते चांगले होते. कर्जाची परतफेडही नियमित होती; पण कोरोनामुळे नोकरीदार, व्यावसायिक आणि उद्योजकांची स्थिती बिघडली आहे. कर्जदारांना कर्जाची परतफेड करावीच लागते. रिझर्व्ह बँकेच्या मोरोटोरियमनंतर हप्ते भरण्याची मुदत पुढे ढकलण्यात आली; पण पुढे हप्ते भरावेच लागतील.
मकरंद फडणीस, युनियन बँक.
बँकांना थकीत अर्थात एनपीए कर्जाची प्रक्रिया पूर्ण करावीच लागते. त्यात कुणालाही सूट देण्यात येत नाही. बँकांनी कर्ज वसुलीसंदर्भात पाऊले उचलली आहेत. कोरोना आहे म्हणून रिझर्व्ह बँकेने कर्ज वसुली थांबविली नसून वसुली ही करावीच लागेल. प्रशासनातर्फे नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढे वेग येणार आहे.
अनिल सोले, शिक्षक सहकारी बँक.