यापुढे कंत्राटदारांकडून ऑनलाइन सुरक्षा ठेव घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:10+5:302021-07-31T04:08:10+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेत कंत्राटदारांकडून एफडी पळविण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे जिल्हा परिषद सतर्क झाली आहे. असले प्रकार कंत्राटदाराकडून पुन्हा ...
नागपूर : जिल्हा परिषदेत कंत्राटदारांकडून एफडी पळविण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे जिल्हा परिषद सतर्क झाली आहे. असले प्रकार कंत्राटदाराकडून पुन्हा होणार नाही म्हणून सुरक्षा ठेव ऑनलाइन घेण्याचा निर्णय बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेतील बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा व लघुसिंचन विभागातील कंत्राटदाराकडून जमा केलेली सुरक्षा ठेव गायब असून, त्या मुदतपूर्वीच काढून घेण्यात आल्याचे समोर आले. हा घोटाळा कोट्यवधीच्या घरात असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत यावर चांगलीच चर्चा झाली. हा प्रकार टाळण्यासाठी कंत्राटदारांकडून सुरक्षा ठेवीची रक्कम ऑनलाइन जि.प.च्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे असे घोटाळे होणार नाही, असा विश्वास अध्यक्ष बर्वे यांनी व्यक्त केला. नानक कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर यांनी सांगितले.