कॅरीबॅगवर कंपनीची जाहिरात करणे चुकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:43 PM2019-04-17T23:43:12+5:302019-04-17T23:59:44+5:30
चंदीगड येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने कंपनीचे ब्रॅण्डिंग होत असलेल्या पेपरच्या कॅरीबॅगसाठी ३ रुपये वसूल केल्याच्या एका ग्राहकाच्या तक्रारीवर फूटवेअर बाटा कंपनीला ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने नागपुरातील मॉल, हॉटेल्स आणि नामांकित कंपन्यांच्या शोरूमची पाहणी केली असता, वस्तू खरेदी केल्यानंतर कापडी आणि पेपर कॅरीबॅगसाठी १५ रुपयांपर्यंत घेण्यात येत असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंदीगड येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने कंपनीचे ब्रॅण्डिंग होत असलेल्या पेपरच्या कॅरीबॅगसाठी ३ रुपये वसूल केल्याच्या एका ग्राहकाच्या तक्रारीवर फूटवेअर बाटा कंपनीला ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने नागपुरातील मॉल, हॉटेल्स आणि नामांकित कंपन्यांच्या शोरूमची पाहणी केली असता, वस्तू खरेदी केल्यानंतर कापडी आणि पेपर कॅरीबॅगसाठी १५ रुपयांपर्यंत घेण्यात येत असल्याचे दिसून आले. ग्राहकांकडून पैसे घेऊन कॅरीबॅगवर कंपनीची जाहिरात करणे चुकीचे असल्याचे मत ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
काही दुकानात मोफत तर मॉलमध्ये विकताहेत कॅरीबॅग
लोकमत चमूने बुधवारी काही मॉल आणि सुपर बाजारची पाहणी केली असता, ग्राहकांना वस्तू खरेदीनंतर कंपनीचे नाव नमूद असलेल्या कॅरीबॅग विकण्यात येत असल्याचे दिसून आले. बाटा कंपनीच्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बाटाचे शोरूम कंपनीतर्फे संचालित करण्यात येते. कंपनीचे नाव प्रिंट असलेल्या पेपर बॅग पाठविल्या असून, किमतही निश्चित केली आहे. ग्राहकाने मागितल्यानंतरच ३ रुपयात पेपर बॅग देतो. आम्ही त्यांना कॅरीबॅग घेण्यास बाध्य करीत नाहीत. लक्ष्मीनगर चौकातील एका मॉलमध्ये ज्यूटच्या बॅगसाठी पैसे घेण्यात येते. याशिवाय जगनाडे चौक, नंदनवन येथील एका बाजारमध्ये कॅरीबॅगसाठी ग्राहकांकडून पैसे आकारण्यात येत होते. ग्राहकांनी बॅग खरेदी करणे बंधनकारक नाही. वस्तू घरी नेण्यासाठी त्यांनी स्वत: कापडी थैली आणावी, असे कर्मचाऱ्याने सांगितले. सदर येथील विजय बुक शॉपमध्ये पुस्तके विकत घेतल्यानंतर प्रिंट नसलेली कॅरीबॅग मोफत देण्यात आली.
कारवाईचा अधिकार कुणाला?
मॉल, सुपर बाजार, शोरूम आणि हॉटेल्समध्ये कंपनीचे नाव प्रिंट असलेल्या कापडी आणि पेपर कॅरीबॅग ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारून विकण्यात येत आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, यावर ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नाही. पण याप्रकरणी कारवाईचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याचे त्यांनी सांगितले. कारण जिल्ह्यातील ग्राहकांचे संरक्षण अबाधित राखण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन होत असल्यामुळे त्यांनी याप्रश्नी स्वत:हून पुढाकार घेत कारवाई करावी, असे पदाधिकारी म्हणाले.जाहिरातींच्या माध्यमातून चॅनल्स लाखो रुपये कमवितात. त्यानंतरही चॅनल पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून प्रत्येक चॅनलसाठी पैसे घेण्यात येते. हा विषयही कॅरीबॅगसारखाच आहे. वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी हा विषय आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगितले.
कॅरीबॅग मोफत द्या
एखाद्या मॉलमधून ग्राहक वस्तूंची खरेदी करीत असेल तर त्यांना कॅरीबॅग मोफत द्यावी. त्यावर कंपनीचे वा मॉलचे ब्रॅण्डिंग होईल, अशी जाहिरात छापणे चुकीचे आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. ग्राहकांच्या खिशात थेट हात घालून मॉलमध्ये पैसे वसूल करण्यात येत आहेत. यावर निर्बंध आणणे आवश्यक आहे.
गजानन पांडे, संघटन सचिव,
अ.भा. ग्राहक पंचायत.
ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन
वस्तूंच्या खरेदीनंतर कॅरीबॅगसाठी ग्राहकांकडून पैसे वसूल करणे चुकीचे आहे. ग्राहकांच्या हतबलतेचा फायदा मॉल आणि मोठ्या शोरूम घेत आहेत. प्रिंटेड कॅरीबॅगमुळे अन्य बाजारातही कंपनीची जाहिरात होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित विभागाला निर्देश देऊन अनावश्यक पैसे वसुलीवर निर्बंध आणावे.
देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय महासचिव,
अ.भा. ग्राहक कल्याण परिषद.
ग्राहकांच्या पैशातून जाहिरात
कापडी, कागदी आणि प्लास्टिक कॅरीबॅगच्या माध्यमातून मॉल आणि मोठ्या कंपन्या ग्राहकांच्या पैशातून जाहिरात करीत आहेत. ब्रॅण्डला सर्वदूर पोहोचविण्याची त्यांची नवी शक्कल आहे. यामुळे १९८६ च्या ग्राहक संरक्षण अधिनियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. ही कंपन्यांची अफेअर पॅ्रक्टिस असून, ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे. ही नवी प्रथा तातडीने बंद व्हावी.
मो. शाहीद शरीफ, राष्ट्रीय अध्यक्ष,
अॅन्टी अॅडल्टेशन कन्झुमर सोसायटी.
पेपर कॅरीबॅगमुळे झाडांची कत्तल
प्लास्टिकवर प्रतिबंध आणून सरकारने पेपर कॅरीबॅगला खुली परवानगी दिली. त्यामुळे झाडांची कत्तल वाढली असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. आता पेपर कॅरीबॅग हे कंपन्या आणि मॉलचे कमाईचे अतिरिक्त स्रोत बनले आहे. कुणीही प्लास्टिक वा कॅरीबॅगवर पुनर्प्रक्रिया करीत नाही. मॉल आणि कंपन्यांनी नाव प्रिंट नसलेल्या कापडी बॅग ग्राहकांना मोफत द्याव्यात.
कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरण तज्ज्ञ.