‘आयटीबीपी’ करणार गडचिरोलीतील नक्षलवाद्यांशी मुकाबला

By Admin | Published: November 14, 2014 12:49 AM2014-11-14T00:49:43+5:302014-11-14T00:49:43+5:30

एकाच ठिकाणी जास्त फोर्सेस न ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यामुळे आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या केंद्र’य राखीव पोलीस दलाला

'ITBP' to counter Gadchiroli Naxalites | ‘आयटीबीपी’ करणार गडचिरोलीतील नक्षलवाद्यांशी मुकाबला

‘आयटीबीपी’ करणार गडचिरोलीतील नक्षलवाद्यांशी मुकाबला

googlenewsNext

संजय कौशिक : ‘सीआरपीएफ’कडे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा बंदोबस्त
नागपूर : एकाच ठिकाणी जास्त फोर्सेस न ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यामुळे आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या केंद्र’य राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ)छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात येणार आहे. गडचिरोलीतील नक्षलवाद्यांसाठी आता इंडो तिबेट बॉर्डर पोलीस तैनात करण्यात आले असून तेच नक्षलवाद्यांशी मुकाबला करतील, अशी माहिती ‘सीआरपीएफ’च्या पश्चिम सेक्टरचे महानिरीक्षक संजय कौशिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘सीआरपीएफ’ला ७५ वर्षे पूर्र्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय कौशिक म्हणाले, गडचिरोली भागातील नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्याची जबाबदारी इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांकडे सोपविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे गडचिरोली भागातील ‘सीआरपीएफ’च्या जवानांना तेथून हटविणे सुरू झाले आहे. ‘सीआरपीएफ’कडे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी मार्चपर्यंत गडचिरोलीतील सर्वच ‘सीआरपीएफ’च्या कंपन्या हलविण्यात येणार आहेत. नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी ‘सीआरपीएफ’ नेहमीच राज्यातील पोलिसांशी समन्वय साधून आपल्या कारवाया करते. सध्या ‘सीआरपीएफ’कडे गांधीनगर, नागपूर, दिल्लीत तीन महिला बटालियन असून आणखी एक महिला बटालियन सुरूकरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘सीआरपीएफ’मध्ये कोब्रा कंपनीच्या १० सुसज्ज कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून देशात उद्भवणाऱ्या पेचप्रसंगांचा सामना करण्यात येतो. सध्या ‘सीआरपीएफ’ला हवे तेवढ्या बुलेट प्रूफ जॅकेटचा पुरवठा झाला नसून आगामी काळात लवकरच हे जॅकेट सर्वांना पुरविण्यात येतील. देशाच्या सुरक्षेसाठी मागील ७५ वर्षे ‘सीआरपीएफ’ने अविरत कार्य केले आहे. हे खूप जोखमीचे काम आहे. ब्रिटिशांच्या काळात क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस या नावाने स्थापन झालेली फोर्स ब्रिटिशांना मदत करायची. पूर्वी फोर्सचे कार्यालय मध्यप्रदेशातील निमज येथे होते. त्यानंतर १९४९ मध्ये सरदार पटेल यांनी ‘सीआरपीएफ’ अ‍ॅक्ट तयार करून फोर्सला ध्वज प्रदान केला. देशात कुठेही पेचप्रसंग उद्भवल्यास ‘सीआरपीएफ’ची मागणी होते. यावेळी महानिरीक्षक संजय कौशिक यांच्या हस्ते बास्केटबॉल स्पर्धेतील विजेती चमू केंद्रीय रिझर्व्ह पोलीस विद्यालय नागपूर आणि उपविजेत्या सेंट झेविअर्सच्या चमूला पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संजय लाठकर, अखिलेश प्रसाद सिंह यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन विनिता ढेकले यांनी केले. (प्रतिनिधी)
२००० ‘सीआरपीएफ’ जवान शहीद
देशात कुठेही तणावाचे वातावरण पसरल्यास केंद्रीय राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात येते. अतिशय कठीण परिस्थितीत जवानांना मुकाबला करायचा असतो. अशा परिस्थितीत देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना ‘सीआरपीएफ’चे २००० जवान शहीद झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संजय कौशिक यांनी देऊन त्यांना अभिवादन केले. याशिवाय अनेक जवानांना कर्तव्य बजावताना कायमचे अपंगत्व आले. काहींचे हात, काहींचे पाय, डोळे निकामी होऊन त्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 'ITBP' to counter Gadchiroli Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.