बीएडच्या जागी ‘आयटीईपी’; शिक्षकांसाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:19 AM2018-11-28T11:19:32+5:302018-11-28T11:19:58+5:30
शिक्षक बनण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बीएड अथवा डीएलएड करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद (एनसीटीई)ने नव्या शैक्षणिक सत्रापासून बॅचलर आॅफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशीष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षक बनण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बीएड अथवा डीएलएड करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद (एनसीटीई)ने नव्या शैक्षणिक सत्रापासून बॅचलर आॅफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात इंट्रीग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (आयटीईपी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा राहणार आहे. परंतु अद्यापही हे स्पष्ट नाही की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ह्या अभ्यासक्रमाला कधीपासून लागू करेल.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात एनसीटीईने अद्यापपर्यंत विद्यापीठाला यासंदर्भात कुठलेही दिशानिर्देश दिलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या अभ्यासक्रमाची माहिती नाही. सूत्रांच्या मते जर एनसीटीईकडून प्रारूप आले तरी अभ्यासक्रम चालू करण्यासाठी विद्यापीठाला बराच वेळ लागणार आहे. कारण विद्यापीठात नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागेल. सोबतच विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागतील.
त्याचबरोबर एनसीटीईच्या दिशानिर्देश आल्यानंतर विद्यापीठाला विद्वत परिषदेत पारित करावे लागले. त्यानंतर निर्देशानुसार अध्ययन मंडळाच्या बैठकीत अभ्यासक्रम तयार करावे लागेल.
यासोबतच विद्यापीठाला एनसीटीईकडून अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी घ्यावी लागेल. सूत्रांच्या मते मंजुरीसाठी विद्यापीठाला २ ते २३ डिसेंबरदरम्यान अर्ज करावा लागेल. विद्यापीठासोबत संबंधित महाविद्यालयांना याच कालावधीत अर्ज करावा लागेल. यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, एनसीटीईकडून कुठलेही दिशानिर्देश आलेले नाही. त्यांना काही महाविद्यालयाकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. दिशानिर्देश आल्यानंतर प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
असा असेल अभ्यासक्रम
एनसीटीईचा आयटीपीई अभ्यासक्रम चार वर्षाचा असेल. प्रवेशासाठी पात्रता बारावी निर्धारित करण्यात आली आहे. बारावीत ५० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल. अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना बीएबीएडची डिग्री मिळेल. सध्या बीएड अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. त्यापूर्वी बीएड एक वर्षाचे होते. एनसीटीईच्या मते शिक्षकांमध्ये गुणवत्ता विकसित करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.